पाथर्डीत भाजप कार्यकर्ते-पोलीस प्रशासनात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST2021-08-15T04:24:06+5:302021-08-15T04:24:06+5:30

पाथर्डी : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीत सहभागी होऊ न दिल्याने भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी व पोलीस प्रशासनात चांगलीच ...

BJP workers in Pathardi-Khadajangi in police administration | पाथर्डीत भाजप कार्यकर्ते-पोलीस प्रशासनात खडाजंगी

पाथर्डीत भाजप कार्यकर्ते-पोलीस प्रशासनात खडाजंगी

पाथर्डी : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीत सहभागी होऊ न दिल्याने भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी व पोलीस प्रशासनात चांगलीच खडाजंगी झाली. आमदार मोनिका राजळे यांनी तेथे येऊन पाेलीस व महसूल प्रशासनास धारेवर धरले. अखेर प्रशासनाने त्या सर्वांनाच बैठकीत सहभागी होण्यास परवानगी दिली. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला.

शनिवारी दुपारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पाथर्डी शहरात आढावा बैठक होती. बैठक सुरू असतानाच भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी आत येण्यास परवानगी मागत होते. पोलीस मात्र प्रशासनाने त्यांना आत येऊ दिले नाही. त्यावेळी कार्यकर्ते व पोलीस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर आमदार मोनिका राजळे तेथे आल्या. त्यांनीही पाेलीस व महसूल प्रशासनास धारेवर धरले. एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय ही काही पक्षाची बैठक नाही, असे सांगताच प्रशासनाने त्यांना आत जाण्यास परवानगी दिली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आतमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते कसे? असा प्रश्न केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर व पोलीस यांच्यात चांगलीच झटापट झाली. त्यानंतर प्रशासनाने आत येण्यास परवानगी दिली.

त्यानंतर कार्यकर्ते आतमध्ये आले. आमदार राजळे यांना व्यासपीठावर बसायला सांगण्यात आले. कार्यकर्त्यांना बसायला जागा नसल्यामुळे ते जमिनीवरच बसले. काही वेळाने त्यांना बसायला खुर्च्या देण्यात आल्या. या प्रकाराचा आमदार राजळे यांनी निषेध केला.

यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार मोनिका राजळे, ॲड. प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, तहसीलदार श्याम वाडकर, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, शिवशंकर राजळे आदी उपस्थित होते.

----

तुमचा गैरसमज झाला असेल..

आम्ही कोणालाही अडवायला सांगितले नाही. तुमचा गैरसमज झाला असेल तर दूर करा, असा निर्वाळा यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिला.

---

पाणी योजनेत लक्ष घालणार

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड व ३५ गावांच्या पाणी योजनेमध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे. या प्रश्नामध्ये कुठलेही राजकारण न आणता हा प्रश्न मार्गी लावला जाईल. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे ठाम उभा राहील, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.

----

१४ पाथर्डी न्यूज

पाथर्डी येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील आढावा बैठकीत प्रवेश दिल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते असे जमिनीवरच बसले होते.

Web Title: BJP workers in Pathardi-Khadajangi in police administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.