भाजप खासदार दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 15:03 IST2018-02-24T14:47:21+5:302018-02-24T15:03:15+5:30
भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप खासदार दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल
अहमदनगर : औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशनुसार शनिवारी भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद खंडपीठाने खासदार गांधी यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते. तसेच या गुन्हाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, असेही औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. २९ सप्टेंबर २०१५ रोजी बिहाणी यांना खंडणी मागितली गेल्याचे बिहाणी यांचे म्हणणे आहे. दिलीप गांधी यांच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी पैशाची मागणी केली असून सुमारे ५० लाख रुपयांची खडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बाबतचे सर्व कॉल रेकॉर्ड फोन मेसेज बिहानी यांनी पोलिसांना दिले आहेत. या चार ही जनांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
ही घटना घडली तेंव्हा फोर्ड शो रूमचे मालक भूषण बिहानी हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र तेथे त्यांना दाद न मिळाल्याने बिहानी यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामध्ये कोर्टाने दिलीप गांधी यांच्यासह त्यांच्या पुत्रवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.