जनतेच्या पैशावर भाजप सरकारचा उत्सव : काँग्रेसचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:57 IST2018-05-25T18:57:21+5:302018-05-25T18:57:34+5:30
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने चार वर्षे पूर्ण केली. परंतु या काळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

जनतेच्या पैशावर भाजप सरकारचा उत्सव : काँग्रेसचा हल्लाबोल
अहमदनगर : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने चार वर्षे पूर्ण केली. परंतु या काळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. मोदींनी निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. हे सरकार केवळ जनतेच्या पैशावर हजारो कोटींच्या जाहिराती देऊन उत्सव साजरा करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार व शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केली.
मोदी सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु या सरकारने चार वर्षांत जनतेचा भ्रमनिराश केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसने पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्ला केला. यावेळी शेलार, चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, युवकचे शहराध्यक्ष गौरव ढोणे, सचिन गुजर, नगर तालुक्याचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, प्रशांत दरेकर (श्रीगोंदा), किरण पाटील (कर्जत) आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शेलार म्हणाले की, मोदी सरकारने विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु काळा पैसा तर दूर, लोकांच्या खात्यात १५ रूपयेही जमा झाले नाही. उलट बँकेत खाते उघडण्याच्या नावाखाली करोडो रूपयांची लूट या सरकारने सामान्य जनतेकडून केली. महागाईवर नियंत्रण आणण्याचे मोदी सत्तेवर येण्यापूर्वी बोलत होते, त्यांनी व त्यांच्या मंत्र्यांनी आता इंधन दरवाढ व त्यामुळे होणाऱ्या महागाईवर बोलावे. हे सरकार सीमेवरील जवानांचे रक्षण तर करू शकत नाही. परंतु त्यांच्या कुटुंबीयांविषयी अपशब्द वापरून त्यांचा अपमान करत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांकडून ५०-५० पानांचे अर्ज भरून घेतले, परंतु ५० पैशाचीही कर्जमाफी शेतकºयाला झाली नाही. केवळ जनतेच्या पैशावर करोडो रूपयांच्या जाहिराती देऊन उत्सव सुरू आहे. हा नेमका कसला उत्सव आहे? देशातील सामान्य माणसाला उद्ध्वस्त केल्याचा? सीमेवर शहीद होणाºया सैनिकांच्या मरणाचा की देशातील ४५ हजार शेतकरी आत्महत्यांचा? असा प्रश्न त्यांनी विचारला.
दीप चव्हाण यांनीही सरकार टीका करत त्यांच्या योजनांची पोलखोल केली. भाजपने मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी अशा योजना आणल्या, पण त्यातून कितीजणांना रोजगार मिळाला, याचे आत्मपरिक्षण या सरकारने करावे. काँग्रेसच्या काळात शेतकºयांना कोणताच कर लावला नाही. मात्र हे सरकार शेतकºयांनाही लुटण्यात कसर सोडत नाही, असे चव्हाण म्हणाले.
काळे झेंडे दाखवणार
देशभर सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात शनिवारी (दि. २६) मूकमोर्चा काढून दिल्लीगेट येथे काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारला काळे झेंडे दाखवून सरकारच्या चार वर्षांतील नाकर्तेपणाचा निषेध करणार आहेत.