बर्ड फ्लूने शेतकरी मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:13+5:302021-01-23T04:21:13+5:30
संजय ठोंबरे चिचोंडी पाटील : दीड वर्षापूर्वी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च करून गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन सुरू केले. व्यवसायाला ...

बर्ड फ्लूने शेतकरी मातीमोल
संजय ठोंबरे
चिचोंडी पाटील : दीड वर्षापूर्वी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च करून गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन सुरू केले. व्यवसायाला कुठं नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र बर्ड फ्लूच्या एका आदेशाने दीड वर्षापासून पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या कोंबड्यांना डोळ्यादेखत प्रशासनाने जमिनीत गाडले.
चिचोंडी पाटील येथील शेतकरी प्रदीप सूर्यभान भद्रे यांनी ‘लोकमत’कडे याबाबत आपली कैफियत मांडली. चिचोंडी पाटील येथे एका कोंबडीचा बर्ड फ्लू अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासनाने त्या केंद्रापासून १ किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची, अंड्यांची, तसेच त्यांच्या खाद्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शुक्रवारी प्रशासनाने भद्रे यांच्या ६० कोंबड्या, ४३० पिले, तसेच ४३० अंडी नष्ट केली. या निर्णयामुळे एका क्षणात भद्रे यांचे स्वप्न भंगले. त्यामुळे अख्ख्या कुटुंबाचे डोळे पाणावले होते.
भद्रे यांनी दीड वर्षापूर्वी गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. खरं तर त्यांनी कोंबड्या विक्रीसाठी नव्हे, तर त्यांच्या अंडे विक्रीसाठी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी भद्रे यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे पाचशे ते आठशे रुपये देऊन एक एक कोंबडी जमा केली होती. आम्ही कोंबड्या कापण्यासाठी नाही तर त्या पाळून अंडी विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी कुक्कुटपालन केले. या सर्व कोंबड्या आयुर्वेद उपचार पद्धतीने रोगप्रतिकारक्षम बनविल्या होत्या. आमच्या कोंबड्यांची बर्ड फ्लू चाचणी केली तरी एकही कोंबडी पॉझिटिव्ह येणे शक्य नाही, असे ते आत्मविश्वासाने सांगत होते.
आजपर्यंत या कोंबड्यांसाठी सुमारे १२ लाखावर खर्च आला. दीड वर्षांपासून निरंतर कष्ट घेत जपलेल्या या कोंबड्यांना आम्ही घरच्यांसाठी किंवा पाहुणचारासाठीही कधी कापल्या नाहीत. चिकन खायचे तर बाहेरून आणून खाल्ले; पण आज कोंबड्यांना कोणताही आजार नसता प्रशासनाने जमितीत गाडल्याचे मोठे दु:ख होते, अशा भावना भद्रे यांनी व्यक्त केल्या.
------------
दीड वर्षांपासून घेतलेली अथक मेहनत पाण्यात गेली. आमच्या पोल्ट्रीत फक्त गावरान कोंबड्यांची पिल्लं विकसित केली होती. जी कोणत्याही कंपनीकडून मिळत नाहीत. आमच्या कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असता तर आम्हीच कोंबड्या नष्ट केल्या असत्या. परंतु दुसरीकडे कुठं अहवाल पाॅझिटिव्ह आला म्हणून आमच्याही कोंबड्यांवर संक्रांत कशासाठी?
- सूर्यभान भद्रे, शेतकरी, चिचोंडी पाटील