आठवड गावात ४० एकरवर फुलविले जैव विविधता उद्यान; पाच हजार झाडांचे संगोपन; रोपवाटिका, विश्रामगृहाची व्यवस्था
By अनिल लगड | Updated: June 5, 2020 12:49 IST2020-06-05T12:40:34+5:302020-06-05T12:49:11+5:30
नगर तालुक्यातील आठवड येथे सरकारच्या माध्यमातून स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने जैव विविधता उद्यान साकारले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ४० एकर जमिनीवर हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात सुमारे ५ हजार झाडांचे संगोपन केले जात आहे. हे उद्यान पर्यावरणप्रेमी, पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

आठवड गावात ४० एकरवर फुलविले जैव विविधता उद्यान; पाच हजार झाडांचे संगोपन; रोपवाटिका, विश्रामगृहाची व्यवस्था
जागतिक वन दिन विशेष /
अहमदनगर : नगर तालुक्यातील आठवड येथे सरकारच्या माध्यमातून स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने जैव विविधता उद्यान साकारले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ४० एकर जमिनीवर हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात सुमारे ५ हजार झाडांचे संगोपन केले जात आहे. हे उद्यान पर्यावरणप्रेमी, पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील नगर -जामखेड रोडवरील आठवड हे छोटेसे गाव. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम पुरस्कार मिळाला. यासाठी गावचे सरपंच राजेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले़ आठवड ग्रामपंचायतीला पडीक जमिनीचे मोठे क्षेत्र आहे. या ठिकाणी म्हसोबा देवस्थानची ४० एकर जमीन आहे. या जमिनीचा ग्रामपंचायतीमार्फत ६ ते ७ हजाराला तीन वर्षासाठी लिलाव होत असे. हा लिलाव पिढ्यान्पिढ्या चालू होता. अनेक जण दोन दोन हजार रुपये गोळा करुन लिलाव घेत. जमीन कसत. यावरुन अनेकात मतभेद होत. पुढे ही जमीन उद्योजक विजय मोरे यांनी ५० हजाराने लिलावाने घेतली. लिलावाची रक्कम ग्रामपंचायतीला विकासासाठी दिली जाते.
राज्य सरकारमार्फत स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने एक कोटी खर्चून जैव विविधता उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारतर्फे नगर जिल्ह्यात आठवड (ता. नगर) व संगमनेर तालुक्यातील नांदुर्खी या दोन गावांची निवड झाली. आठवड येथे म्हसोबा देवस्थानची ४० एकर जमीन यासाठी दिली. सरकारमार्फत तीन वर्षापूर्वी या ठिकाणी काम सुरू झाले. या उद्यानात सुमारे ५ हजार लहान मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात गेस्ट हाऊस, वनौद्यात येणा-या नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांची खेळणी, प्राण्यांचे पुतळे, वेलवर्गीय झाडे लावली. ही झाडे सध्या चांगली बहरली आहेत. यातून गावातील २० ते २५ तरुणांना रोजगार मिळाला आहे.
उद्यानात रोपवाटिका उभारली आहे. यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या उद्यानाला भेट देण्यासाठी येथे परजिल्ह्यातून पर्यटनप्रेमींची वर्दळ वाढत आहे. या उद्यानामुळे परिसरात पर्यावरणाला चालना मिळाली. गावात दहा वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या ९ एकर पडीक जागेवरही ८ हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. यावर चिंच, जांभूळ, आंबा व इतर झाडे फुलविली आहेत. यामुळे गावचे निसर्गसौंदर्य चांगले फुलले आहे.
स्वखर्चातून गावात कामे
आठवड गावात अनेक सुशोभिकरणाची कामे स्वखर्चाने केली आहे. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय मोरे यांचे मोठे योगदान आहे. गावाच्या विकासासाठी ते स्वत: निधी देतात. त्यांनी गावातील मागासवर्गीय अनेक नागरिकांना स्वखर्चातून शौचालये बांधून दिली आहेत. गावात स्वच्छता, भुयारी गटार योजना, ग्रामपंचायत इमारत, रस्ते काँक्रिटीकरण ही कामे ग्रामपंचायतीने केली आहेत. दोन वर्षापासून मी स्वत: स्वखर्चाने कचरा गाडीने गावातील कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावत आहे, असे सरपंच राजेंद्र मोरे यांनी सांगितले.
उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. शासनामार्फत या उद्यानाची देखरेख होत आहे. सरकार हे उद्यान ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्याच्या तयारीत आहे. परंतु या उद्यानाची देखभाल ग्रामपंचायत करु शकत नाही. यासाठी निधीची आवश्यकता भासेल. सध्या येथे शासनाची रोपवाटिका आहे. त्यामुळे त्याची देखरेख चांगली होत आहे.
-राजेंद्र मोरे, सरपंच, आठवड, ता. नगर.