भोंदू -बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचा प्रयत्न, रोहित पवारांची भाजपवर टीका
By सुदाम देशमुख | Updated: April 2, 2023 13:23 IST2023-04-02T11:34:01+5:302023-04-02T13:23:18+5:30
बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

भोंदू -बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचा प्रयत्न, रोहित पवारांची भाजपवर टीका
अहमदनगर : भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध कर्जत -जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून हा निषेध नोंदवला आहे.
ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, "यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागला आहे. भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. जगात गांधी विचार अजरामर आहेत. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं!"
याचबरोबर, निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलंय. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं. बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.