भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:15 IST2018-01-02T12:04:51+5:302018-01-02T12:15:32+5:30
नगर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ नगर शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही भागात दगडफेकही करण्यात आली.

भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड
अहमदनगर : सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोडीचे पडसाद मंगळवारी नगर जिल्ह्यात उमटू लागले आहेत. नगर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ नगर शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही भागात दगडफेकही करण्यात आली.
भिंगार येथे बंद पाळण्यात आला. नगर शहरातील माळीवाडा येथे काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. मार्केट यार्ड, कायनेटिक चौक, माळीवाडा, वाडीयापार्क परिसरात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. काही तरुणांनी नगर शहरातून दुचाकीवरुन घोषणाबाजी करीत शहरात फिरत व्यावसायिकांना दुकाने बंद करायला लावली. श्रीरामपूरमध्ये बंद पाळण्यात आला असून, शहरात तणाव पसरला आहे. शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. राहाता येथे रास्ता रोको करण्यात आला. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे.