भाऊसाहेब बेपत्ता, ‘डमी’च्या हाती सत्ता

By Admin | Updated: July 3, 2014 00:59 IST2014-07-03T00:39:45+5:302014-07-03T00:59:16+5:30

अहमदनगर : 'सरकारी काम सहा महिने थांब' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयावर आला.

Bhausaheb disappeared, the power of the 'dummy' | भाऊसाहेब बेपत्ता, ‘डमी’च्या हाती सत्ता

भाऊसाहेब बेपत्ता, ‘डमी’च्या हाती सत्ता

अहमदनगर : 'सरकारी काम सहा महिने थांब' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयावर आला. मंत्रालयातील काम लवकर होईल पण तलाठी कार्यालयातील काम होईलच याची शाश्वती देता येणार नाही. बुधवारी 'टीम लोकमत' ने जिल्ह्यातील ५८३ तलाठी सज्जांपैकी ९० सज्जांवर एकाच वेळी भेट देऊन पाहणी केली. यातून पुढे आलेले वास्तव धक्कादायक आहे. तलाठी कार्यालयात हजर असतील या अपेक्षेने हातात कागदाचा पुडका घेऊन अर्धशिक्षित शेतकरी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवून दमतात तरी देखील तलाठ्यांना घाम फुटत नाही. प्रत्येक तलाठ्याने एक डमी सजावर ठेवलेला आहे. तलाठी कार्यालयाचे काम एका हेलपाट्यात झाले असे म्हणणारा एकही व्यक्ती शोधूनही सापडला नाही. याचा अनुभव बुधवारी स्टींग आॅपरेशन मुळे निदर्शनास आला. एकाच वेळी जिल्ह्यातील तलाठी सजांवर जाऊन तलाठी कार्यालयाच्या 'कारभाराची' पाहणी केली. यातून पुढे आलेले हे वास्तव. (टीम लोकमत, अहमदनगर)
नगर तालुक्यातील ४ तलाठी कार्यालयांना भेट दिली असता तेथील कारभाराने शेतकरी वैतागल्याचे दिसून आले. त्याचा हा वृत्तांत...
नगर तालुका : तलाठी कार्यालय
गाव- चास- वेळ-१०-३०
चासमधील तलाठी कार्यालयाला कुलूप होते. चौकशी केली असता तलाठी भाऊसाहेबांकडे चास, सोनेवाडी, भोयरे पठार, भोयरे खुर्द या गावांचा ‘चार्ज’ आहे. त्यांनी आपला एक ‘असिस्टंट’ ही नेमला आहे. पण आज तोही भाऊसाहेबांबरोबर ‘बाहेर’ गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गाव : खडकी, वेळ- ११
खडकीच्या तलाठी भाऊसाहेबांकडे खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद ही तीन गावे आहेत. भाऊसाहेबांना जास्त काम असल्याने त्यांनी कुणाची ‘गैरसोय’ नको किंवा हेलपाटा नको म्हणून चक्क कोऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यावर सह्या करून ठेवल्या होत्या. ‘असिस्टंट’ साहेब प्रत्येकाकडून १० रुपये घेऊन दाखला देत होता.
गाव : वाळकी, वेळ- ११-५०
तलाठी कार्यालयाजवळ गेलो तर त्याला टाळे. चौकशी केली तर समजले तलाठी साहेब येतच नाहीत. उताऱ्यांची संगणकीकृत सोय नाही. झेरॉक्स दाखला लागणाऱ्यालाच आणायला सांगतात. त्याचे ३० रुपये घेतात. गावकरी म्हणाले, आमच्या भाऊसाहेबांकडे घड्याळच नसल्याने त्यांना वेळेचे बंधन नाही. येथे पूर्ण वेळ तलाठी नेमावा अशी मागणी प्रकाश बोठे व रावसाहेब बोठे यांनी केली.
अरणगाव- बाबुर्डी घुमट, वेळ- १२-१५ ते १२-३०
दोन्हीही गावाला एकच तलाठी. पण दोन्हीही तलाठी कार्यालय बंद. बाहेर तलाठी येण्याचे वार लिहिलेले होते. आज बाबुर्डीचा वार म्हणून बाबुर्डी गाठली. तर कळाले भाऊसाहेब येथे येतच नसतात. आम्ही विचारले वार तर लिहिलेले आहेत? गावकरी म्हणाले वार फक्त नावापुरते आहे. वारांमुळे तर सगळा घोटाळा चालू आहे.

Web Title: Bhausaheb disappeared, the power of the 'dummy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.