अहमदनगर : जितेंद्र भाटिया खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार जितेंद्र यांची पत्नी दिव्या उर्फ हेमा हिच्याकडून पोलीस तपासास प्रतिसाद मिळत नाही़ आरोपीकडून खून प्रकरणात वापरलेले सिमकार्डसह अन्य तपासासाठी आरोपी दिव्याला शुक्रवारी न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ तसेच दुसरा आरोपी गोट्या बेरड याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रथम न्यायदंडाधिकारी बी़ ए़ गायकवाड यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला़ गंजबाजारातील ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र भाटिया यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला़ या प्रकरणी दिव्या भाटिया व प्रदीप कोकाटे या दोघांना ताब्यात घेतले आहे़ प्रेमसंबधातून जितूचा खून केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे़ जितेंद्र भाटिया यांच्या खूनात त्यांच्या पत्नी दिव्या हिने आरोपीला मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दिव्याची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली़ त्यामुळे आरोपी दिव्यासह गोट्या बेरडला शुक्रवारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते़ या खून प्रकरणात पाच-सहा सिमकार्डचा वापर आरोपींनी केल्याचे तपासात उघड झाले आहे़ भाटिया यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी प्रदीप याच्याकडे सहा सिमकार्ड आढळून आले़ त्यातील एक सिमकार्ड प्रदीपने दिव्याला दिले होते़ ते तोडून नष्ट केल्याचे दिव्याकडून सांगण्यात येते़ पुढील तपासात सिमकार्डमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे, यासह अन्य तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी केला़ त्यावर तपासात सिमकार्ड सापडणे आवश्यक नाही़ कारण संबंधित क्रमांकावरून कुणाला कॉल केले, याची माहिती संबंधित कंपनीकडे मिळेल, असा युक्तिवाद आरोपी पक्षाकडून करण्यात आला़ न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर आरोपीच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने १२ मे पर्यंत वाढ केली़ भाटिया प्रकरणात अनेक सिमकार्डचा वापर झाल्याची पोलिसांना शंका आहे़ मात्र आत्तापर्यंत अवघे एक सिमकार्ड पोलिसांच्या हाती लागले आहे़ इतर सिमकार्डचा तपास सुरू आहे़ सिमकार्डमधून इतर कुणाला आरोपींनी कॉल केले आहेत काय आणि कशासाठी, याचा तपास अजून बाकी आहे़ सरकारी पक्षातर्फे अॅड़ एफ ़ एम़ शेख यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड़ महेश तवले व संजय दुशींग यांनी बाजू मांडली़ (प्रतिनिधी)
भाटिया हत्याप्रकरण : पोलीस सीमकार्डच्या शोधात
By admin | Updated: May 11, 2014 00:55 IST