भानुदास मुरकुटे लढविणार जिल्हा बँकेची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:53+5:302021-02-06T04:37:53+5:30
शिवाजी पवार लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी श्रीरामपुरात सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा सहकारी बँकेची ...

भानुदास मुरकुटे लढविणार जिल्हा बँकेची निवडणूक
शिवाजी पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी श्रीरामपुरात सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. मात्र मुरकुटे हे महाविकास आघाडीसोबत जाणार की भाजपची साथ करणार हे स्पष्ट झालेले नाही. ते भाजपसोबत गेल्यास येथून विद्यमान संचालक करण ससाणे यांच्याशी त्यांचा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष श्रीरामपूरकडे वळले आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे तसेच भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे समर्थक माजी सभापती दीपक पटारे यांनी अर्ज दाखल केले आहेत. मुरकुटे समर्थक कोंडीराम उंडे यांचाही सेवा संस्था मतदारसंघातून अर्ज आहे. मुरकुटे यांनी शेतीपूरक, बिगर शेती व ओबीसी मतदारसंघातही अर्ज ठेवले आहेत. ससाणे यांचादेखील ओबीसी मतदारसंघातून अर्ज दाखल झालेला आहे.
मुरकुटे हे अशोक साखर कारखान्याचे सूत्रधार आहेत. कारखान्याला पूर्वी राज्य सहकारी बँकेकडून पतपुरवठा केला जात होता. मात्र चालू गाळप हंगामासाठी अशोकने जिल्हा बँकेकडून कर्ज उचलेले आहे. याशिवाय मुरकुटे हे जिल्ह्यातील सहकारातील ज्येष्ठ व मातब्बर नेते आहेत. त्यांच्या भूमिकेला राजकीय महत्त्व असते. बँकेच्या निवडणुकीसाठी केवळ माघारीकरिता ते अर्ज दाखल करतील अशी शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरून कुतूहल वाढले होते.
दरम्यान, मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपण सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. आपण राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याशी त्यासंदर्भात चर्चा केलेली नाही, असे ते म्हणाले. मुरकुटे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणार की भाजपची साथ करणार हे गुलदस्त्यात आहे. त्यांनी भाजपकडून उमेदवारी केल्यास विखे समर्थक दीपक पटारे हे त्यांच्याकरिता अर्ज माघारी घेणार का? हे पहावे लागेल.
महसूलमंत्री थोरात यांनी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मागील महिन्यात बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला करण ससाणे हे उपस्थित होते. थोरात यांच्याच आदेशावरून ससाणे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मुरकुटे विरुद्ध ससाणे लढतीची शक्यता आहे.
---------
पळवापळवी नाही
निवडणुकीसाठी दि.११ रोजी अर्ज माघार, तर २० रोजी मतदान होत आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना येथे अजूनही उमेदवारांच्या भेटीगाठींनी जोर पकडलेला नाही. सेवा संस्था मतदारसंघातून ६९ मतदार आहेत. राजकीय बलाबल पाहता संघर्षपूर्ण लढत होणार आहे. कोणाकडेही स्पष्ट कौल नाही. मात्र तरीही मागील निवडणुकांप्रमाणे यंदा मतदारांची पळवापळवी झालेली नाही.
------------