भंडारदरा धरण २५ टक्के भरले

By Admin | Updated: July 23, 2014 00:15 IST2014-07-22T23:09:20+5:302014-07-23T00:15:18+5:30

अकोले/राजूर : पुष्य नक्षत्रातील पहिल्या चरणात मंगळवारी दिवसभर शहर परिसरासह घाटघर व हरिश्चंद्रगड या आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडला.

Bhandardara dams filled 25 percent | भंडारदरा धरण २५ टक्के भरले

भंडारदरा धरण २५ टक्के भरले

अकोले/राजूर : पुष्य नक्षत्रातील पहिल्या चरणात मंगळवारी दिवसभर शहर परिसरासह घाटघर व हरिश्चंद्रगड या आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडला. सोमवारी घाटघरला ४, तर रतनवाडीला ६ इंच पाऊस पडल्याची नोंद झाली. प्रवरा खोऱ्यातील कृष्णवंती नदीवरील वाकी व मुळा खोऱ्यातील आंबीत, कोथळे व शिळवंडी लघुपाटबंधारे तलाव ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत भंडारदऱ्यात १९० दलघफू नवीन पाणी येऊन साठा २ हजार ८०० दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला.
रविवारी पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर ओसरला होता, मात्र सोमवार, मंगळवार पुष्य नक्षत्रातील मुसळधार सरींनी बरसात केली. अकोले शहरातून यावर्षी प्रथमच पाणी वाहिले. भंडारदरा धरणात सोमवारी झालेल्या पावसाने २४ तासांत २१७ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली.
सोमवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये घाटघर - ९२ (१०९०), रतनवाडी- १४२ (११५२), पांजरे- ६२ (५६४), वाकी- ५० (४०७), भंडारदरा- ५४ (४६१), कोतूळ १३ (८४), निळवंडे- १४(६३), आढळा- २ (१४), अकोले- २०(३०) पाऊस पडला. अकोले, इंदोरी परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे निळवंडेत ५१४ दशलक्ष घनफूट साठा झाला. आंबीत, कोथळा, शिरपुंजे, वाकी तलाव ओसंडून वाहत असून हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदीपात्रातून ७ हजार ३५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे.
(तालुका प्रतिनिधी)
मुळा धरणात पावणेदोन टीएमसी नवे पाणी
राहुरी : हरिश्चंद्रगड व कोतूळ या मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणात १८०० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची नोंद झाली. मंगळवारी धरणात तब्बल ७३५० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे हा साठा ६७०० दशलक्ष घनफुटांवर पोहोचला. सोमवारी मुळा नदीतून धरणात ४३२७ क्युसेकने आवक सुरू होती. परंतु पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने आवक ३ हजाराने वाढून ७३५० क्युसेक झाली.

Web Title: Bhandardara dams filled 25 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.