वीकेंडला भंडारदरा परिसर पर्यटकांसाठी लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:06+5:302021-07-02T04:15:06+5:30

अकोले : कोविडच्या संकटामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. जलोत्सव, फुलोत्सव व काजवा ...

Bhandardara area locked for tourists on weekends | वीकेंडला भंडारदरा परिसर पर्यटकांसाठी लॉक

वीकेंडला भंडारदरा परिसर पर्यटकांसाठी लॉक

अकोले : कोविडच्या संकटामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. जलोत्सव, फुलोत्सव व काजवा उत्सव रद्द झाले. लॉकडाऊन शिथिल झाल्याने गर्दी वाढू लागली. यामुळे परिसरातील वन समित्या, ग्रामपंचायत प्रशासन व वन्यजीव यांच्या एकमताने वीकेंड भंडारदरा परिसर लाॅक करण्यात आला आहे.

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली होती. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर 'विल्सन डॅम' भंंडारदरा जलाशय पाणलोटातील ४० किलोमीटरच्या रिंगरोड परिसरात पर्यटन व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली. पर्यटकांची मंदियाळी दिसू लागली. गर्दी वाढल्याने एकमताने वीकेंडला पर्यटनासाठी भंडारदरा परिसर लाॅक करण्यात आला आहे. शनिवार व रविवार दोन दिवस पर्यटकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. आठवड्यातील पाच दिवस पर्यटन सुरू राहणार आहे.

वन्यजीव विभागाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे व वनपरिक्षेत्रपाल डी. डी. पडवळ व अमोल आडे यांनी सांगितले. लोक घरात बसून वैतागल्याने निसर्गरम्य वातावरणात जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे अनलाॅकमुळे पर्यटनाबरोबरचं पर्यटन व्यवसायाला उभारी मिळण्याची आशा आहे. संपूर्ण जगावर सध्या कोरोना महामारीचे मोठे संकट ओढवले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने नियम थोडेसे शिथिल करण्यात आले आहेत. पर्यटन व्यवसायावर आधारलेले टुरिस्ट, हॉटेल, रिसॉर्ट, त्यात काम करणारी कर्मचारी, त्या पर्यटन स्थळी छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक अडचणीत आले होते.

अकोले तालुक्यातील भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, साम्रद, उडदावणे, पांजरे परिसरात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात अमृतेश्वर स्वराचे हेमाडपंथी मंदिर तसेच रंधा फॉल येथील घोरपडा मातेचे मंदिर परिसरात निसर्गरम्य परिसर तसेच साम्रद येथील सांदण दरी तर घाटघर येथील कोकणकडा आणि घाटनदेवीचं मंदिर व उर्ध्व धरणाचा जलाशय आदींचा समावेश आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायावर मर्यादा आल्या होत्या. कोरोनामुळे कोंडमारा झालेल्या व एकंदरीत धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आलेल्या प्रत्येकाला वेगळ्या वातावरणात जावेसे वाटणे स्वाभाविक आहेत. म्हणून संचारबंदी उठल्यानंतर लोक घरातून पर्यटनाकरिता बाहेर पडत आहेत, मात्र अशावेळी पर्यटकांना प्रवास करताना व पर्यटनस्थळी गेल्यावर मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्स आदी कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

वीकेंडला बंदी घातली गेल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

.............

पर्यटन महामंडळ पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. उपहारग्रह, रिसॉर्ट निर्जंतुकीकरण, पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा आणि स्प्रे अशी व्यवस्था करण्यात आली आहेत. गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोलीपर्यंत अल्पोपाहार, जेवण पुरविण्यात येईल तसेच पर्यटकांना संचारबंदीनंतर दक्षता घेऊन पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

- किशोर उगले, व्यवस्थापक, भंडारदरा डॅम

..............

कोरोणा महामारीच्या संकटामुळे काजवा महोत्सवात पर्यटकांंना पर्यटनास बंदी असल्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद होऊन उपासमारीची वेळ आली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात काजवा व निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असले तरी कोरोनामुळे मोठ्या व्यवसायाला मुकावे लागल्याने हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

- राजा राठोड, हॉटेल व्यावसायिक

Web Title: Bhandardara area locked for tourists on weekends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.