जामखेड पंचायत समितीसमोर भजन-कीर्तन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:35+5:302021-07-20T04:16:35+5:30
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्त ...

जामखेड पंचायत समितीसमोर भजन-कीर्तन आंदोलन
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमाेर सोमवारी सकाळी भजन-कीर्तन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री महादेव जानकर यांनी पाठिंबा देऊन तत्काळ मदारी समाजाला न्याय देण्याची मागणी केली.
खर्डा व जामखेड येथील मदारी समाज बांधव, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष अतिश पारवे, बाबासाहेब गाडे महाराज, राजेंद्र महाराज झेंडे, मृदंगाचार्य भीमराव वाघ, मदारी समाजाचे प्रतिनिधी सलीम मदारी, सिकंदर मदारी, मेहबूब मदारी, फकीर मदारी, रहीम मदारी, हुसेन मदारी, अस्लम मदारी आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
जानकर म्हणाले, मदारी वसाहतीच्या बांधकामास कमी पडत असलेली १६ लाख रुपये रक्कम माझ्या आमदार निधीतून देण्यास तयार आहे. तुम्ही त्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स लावून काम विनाविलंब तत्काळ मार्गी लावा. तांत्रिक मुद्द्यावरून गोरगरीब जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा सल्ला जानकर यांनी गटविकास अधिकारी परशुराम कोकणे यांना दिला.
डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयात मदारी समाज बांधव, वारकऱ्यांनी भजन-कीर्तन आंदोलन केले. नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधी आजिनाथ शिंदे, आदिवासी समाजाच्या प्रतिनिधी लोचना काळे, शब्बीर काळे, अंकुश पवार, विशाल जाधव, सनी जाधव आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनास यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या यशस्वितेसाठी सचिन भिंगारदिवे, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, राकेश साळवे, दीपक माळी, तुकाराम शिंदे, राजू शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
-----
दोन महिन्यांत काम सुरू
माजी मंत्री महादेव जानकर यांनी गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. आमदार रोहित पवार व साहाय्यक समाज कल्याण आयुक्त रामकिसन देवढे यांच्याशी भ्रमणध्वनीवर मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. त्यावर या कामाच्या ई निविदा काढण्याच्या सूचना दिल्या असून, येत्या २ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करू, असे आश्वासन दिले.
-----
१९ जामखेड आंदोलन
मदारी वसाहतीचे काम लवकर सुरू करावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित जामखेड पंचायत समितीसमोरील भजन-कीर्तन आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक.