बेरोजगारांनो सावधान; डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:12+5:302021-07-14T04:24:12+5:30
अरुण वाघमाेडे अहमदनगर : नोकरीसाठी एखाद्या वेबसाइटवर ऑनलाइन ॲप्लिकेशन करत असाल तर सावधान. तुमची फसवणूक होऊ शकते. कारण इंटरनेटवरील ...

बेरोजगारांनो सावधान; डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा !
अरुण वाघमाेडे
अहमदनगर : नोकरीसाठी एखाद्या वेबसाइटवर ऑनलाइन ॲप्लिकेशन करत असाल तर सावधान. तुमची फसवणूक होऊ शकते. कारण इंटरनेटवरील वेवेगळ्या सर्च इंजिनवर सायबर गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात डमी वेबसाइट तयार करून ठेवल्या आहेत. येथे ॲप्लिकेशन केल्यानंतर तत्काळ नोकरी देण्याचे आमिष दाखविले जाते. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून पैसे उकळले जात आहेत. जॉब फ्रॉड संदर्भात गेल्या अडीच वर्षांत येथील सायबर पोलीस ठाण्यात साडेतीनशे तक्रारी दाखल आहेत.
दहावी-बारावी ते उच्चशिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगारांची देशभरात मोठी संख्या आहे. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगार बेरोजगारांना लक्ष्य करत आहेत. नामांकित कंपनीत चांगल्या प्रकारची नोकरी, परदेशात जाण्याची संधी तसेच सरकारी नोकरी, अशा जाहिराती गुन्हेगार सोशल मीडियावर व्हायरल करतात. या जाहिरातींत नोकरीच्या अर्जासाठी एक वेबसाइट दिलेली असते. अनेक जण अशा जाहिरातींची अथवा वेबसाइटची खातरजमा न करता अर्ज करतात. त्यासोबतच त्यांची शैक्षणिक कागदपत्रे तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड अपलोड करतात. अर्जदारांचा सर्व डाटा गुन्हेगारांना आयता मिळतो. कधी हा डाटा विकला जातो तर कधी नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळले जात आहेत.
-----------------------
सायबर टोळ्या परप्रांतीय
नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणारे गुन्हेगार कधीच स्वत:ची खरी ओळख समोर आणत नाहीत. संपर्कासाठी त्यांनी वापरलेला मोबाइल, सीम कार्ड, लॅपटॉप अथवा इंटरनेट कनेक्शन सर्व काही बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेले असते. त्यामुळे ही फसवणूक कोणत्या ठिकाणाहून झाली आहे. हे तपासात समोर आले तरी थेट गुन्हेगारांना अटक करणे अवघड असते. जॉब फ्रॉड करणाऱ्या बहुतांश गुन्हेगारी टोळ्या परप्रांतीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
-------------------------
खरी अन् खोटी वेबसाइट अशी ओळखा
सरकारी नोकऱ्यांसंदर्भात वेबसाइट असल्यास वेबसाइटच्या शेवटी जीओव्ही डॉट इन किंवा डॉट एनआयसी असे असते. अपेक्षेपेक्षा जास्त प्रलोभने दाखविले जात असल्यास काळजी घ्यायला हवी. काही नामांकित कंपन्यांच्याही डमी वेबसाइट सायबर गुन्हेगारांनी तयार केलेल्या आहेत. त्यावर दिलेले कस्टमर केअर क्रमांकही बनावट असतात. अशावेळी अर्जदाराने पूर्ण खात्री करूनच पुढील प्रक्रिया राबवावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्यातील हेड कॉस्टेबल योगेश गोसावी यांनी केले आहे.
----------------------------
अशी घ्यावी काळजी
नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करताना ती वेबसाइट अधिकृत आहे की, नाही याची खातरजमा करावी. अनोळखी व्यक्तीसोबत नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
नोकरीसाठी वेगवेगळी कारणे सांगून पैसे मागितले जात असतील तर ते देऊ नयेत. तसेच शैक्षणिक पात्रतेपेक्षा मोठी नोकरी आणि जास्त पगाराची ऑफर दिली जात असेल तर निश्चितच फसवणूक होत आहे. हे समजून घ्यावे. तसेच अनोळखी व्यक्तीकडे आपले ओरिजिनल कागदपत्रे कधीच देऊ नयेत.
- राजेंद्र भोसले, प्रभारी निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, अहमदनगर