तूप खरेदी करताना सावधान! १० लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 15:10 IST2024-09-07T15:10:21+5:302024-09-07T15:10:50+5:30
गुजरात, इंदौर येथून आलेल्या भेसळयुक्त तूपावर अहमदनगरमध्ये कारवाई.

तूप खरेदी करताना सावधान! १० लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क |
अहमदनगर : ऐन सणासुदीत नगर शहरात भेसळयुक्त वनस्पती तुपावर अन्न व प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील आरएनए मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट कंपनीचे ३ लाख ६१ हजार ९९० रुपयांचे व गुजरातमधील अबाद कंपनीचे ५ लाख ९० हजारांचे वनस्पती तूप भेसळयुक्त आढळून आले आहे. या कंपन्यांना अन्न व प्रशासन विभागाकडून शुक्रवारी नोटीस देण्यात आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी केडगाव उपनगरातील गुरुदत्त मार्केट व दाळमंडई येथील कटारिया ट्रेडर्स यांच्याकडून काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. आरएनए मिल्कचे ३५ बॉक्स वनस्पती तुपाचे जप्त करण्यात आले होते. तर अबाद कंपनीचे ५५ बॉक्स जप्त करण्यात आले होते. या तुपाचे नमुने पुण्यातील एका प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. या प्रयोगशाळेचा अहवाल आला असून दोन्ही तुपात भेसळ आढळून आली आहे, अशी माहिती नगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिली.
किरकोळ दुकानात वितरित होण्यापूर्वीच होलसेल एजन्सीमधून माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कंपनी इतर तुपाच्या तुलनेत अतिशय कमी दरात तुपाची विक्री करत होती. यातून संशय निर्माण झाला होता. ही कारवाई दूध आणि दुग्धजन्य भेसळ समितीचे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, डेअरी डिओ गिरीष सोनवणे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, सहायक आयुक्त डॉ. बी. डी. मोरे यांनी केली. पुढील चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.