सभापतिपदासाठी बाेरुडे, तर उपसभापतिसाठी जाधव यांचे नाव आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:02+5:302021-09-09T04:27:02+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीसाठी येत्या बुधवारी सभा होत असून, सभापतिपदासाठी सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे, ...

सभापतिपदासाठी बाेरुडे, तर उपसभापतिसाठी जाधव यांचे नाव आघाडीवर
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीसाठी येत्या बुधवारी सभा होत असून, सभापतिपदासाठी सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे, तर उपसभापतिपदासाठी काँग्रेसच्या सुप्रिया जाधव यांचे नाव आघाडीवर आहे.
महापालिकेची महिला व बालकल्याण समिती संपुष्टात आलेली आहे. या समितीवर सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी सभा घेण्याबाबतचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला हाेता. विभागीय आयुक्तांकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी, १५ रोजी सर्वधारण सभा होत आहे. पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत ही सभा होणार असून, या सभेत सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे.
महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. महापौरपद सेनेकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. उपसभापतिपद काँग्रेसला देऊन सत्तेत वाटा दिला जाणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेसकडून गटनेत्या सुप्रिया जाधव यांची महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी नेमणूक झालेली आहे. महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद सेनेला, तर उपसभापती काँग्रेसला दिले जाण्याची शक्यता आहे. सभापतिपदासाठी सेनेकडून पुष्पा बोरुडे यांचे, तर उपसभापती पदासाठी सुप्रिया जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.
....
सभागृहनेता विरोधी पक्षनेते पदाचा घोळ सुरूच
महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने विरोधी पक्षनेता व सभागृह नेते बदलले जाणार आहेत. विरोधी पक्षनेेते पदावर भाजपने दावा केला आहे. यासंदर्भात भाजपची बैठक झाली होती. परंतु, या बैठकीत एकमत झाले नाही. माजी आमदार शिवाजी कर्डिले हे वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. सभागृहनेते पदासाठी सेनेकडून नगरसेवक अशोक बडे, अनिल शिंदे, सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या नावाची चर्चा आहे.