बाप्पा पावले
By Admin | Updated: September 7, 2016 00:37 IST2016-09-07T00:35:32+5:302016-09-07T00:37:28+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, या उत्सवामुळे बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली आहे़

बाप्पा पावले
अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, या उत्सवामुळे बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली आहे़ गेल्या सात ते आठ दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे़ गणेश मूर्ती, सजावटीसह विविध साहित्य विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून मंदावलेल्या बाजारपेठेला यंदा गणपती बाप्पा चांगलेच पावले असल्याचे म्हणता येईल़
शहरात गेल्या दोन दिवसांत गणेश मूर्ती विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली़ महाराष्ट्रासह परराज्यातूनही यंदा येथील मूर्तींना मोठी मागणी होती़ शहरातील मूर्ती कारखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून दीड हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले़ सजावटीसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक व इतर साहित्यांचीही मोठी विक्री झाली़ गणपती पूजेसाठी लागणारे छोटे-मोठे साहित्य विक्रीसाठी जिल्हाभरातून विक्रेते नगर शहरात आले होते़ केळी, डाळिंब, मोसंबी, सिताफळ, नारळ, केळी या फळांना मोठी मागणी वाढली आहे़ उत्सवानिमित्त विविध मंडळांकडून टी शर्टस्, जॉकेट व बनियानवर प्रिटिंग करून घेतले जात असून, कापडबाजारासह कारागिरांनाही चांगली संधी उपलब्ध झाली आहे़
दुष्काळामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून थंड पडलेल्या बाजारपेठेला चांगलीच उर्जितावस्था आली आहे़ गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, विविध ठिकाणी सर्वधर्मीय एकत्र येऊन उत्सव साजरा करत आहेत़ पोलिसांनी केलेल्या आवाहनाला अनेक गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकत्रित गणपतीची प्रतिष्ठापना केली़
नगर शहरात ८ खासगीसह ४५८ सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेत प्रतिष्ठापना केली आहे़ विविध परिसरात बालमंडळांनीही प्रतिष्ठापना केल्या आहेत़
(प्रतिनिधी)
यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातही जवळपास सर्वच मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे़ यामुळे काळाच्या पडद्याआड जावू पाहणारे सनई, डफ, लेझीम,झांज या वाद्यांचा पुन्हा एकदा गजर सुरू झाला आहे़
४शहरात विविध मंडळांच्यावतीने गणेशोत्सवात विविध आकर्षक व प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात़ यंदाही पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या देखाव्यासह विविध भव्य देखाव्यांचे काम अंतिम टप्यात असून, नगरकरांना हे देखावे खुले होण्याची प्रतीक्षा आहे़ शहरासह जिल्हाभरातील नागरिक हे देखावे पाहण्यासाठी येतात़