बारा तास जड वाहनांवर बंदी

By Admin | Updated: July 4, 2014 01:22 IST2014-07-04T01:19:02+5:302014-07-04T01:22:05+5:30

अहमदनगर : सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत कोणतेही जड वाहन शहरात येऊ दिले जाणार नाही, याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Banned for 12 hours heavy vehicles | बारा तास जड वाहनांवर बंदी

बारा तास जड वाहनांवर बंदी

अहमदनगर : सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत कोणतेही जड वाहन शहरात येऊ दिले जाणार नाही, याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच बाह्यवळण रस्त्यावरून वाहतूक वळविण्यासाठी आठ दिवसांमध्ये सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे.
शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार अनिल राठोड, रिक्षा युनियनचे अध्यक्ष शंकरराव घुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले,वसंत लोढा, संजय झिंजे, मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे सुरेश इथापे, करिमभाई हुंडेकरी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पॅगो रिक्षा चालकांची मनमानी,शहरातील अतिक्रमणे, अरुंद रस्ते, बाह्यवळण रस्त्यावर झालेले खड्डे, शहरातून सुरू असलेली जड वाहतूक, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे होत नसलेले पालन, बंद सिग्नल, पोलिसांकडून होत नसलेली कारवाई आदी मुद्द्यांवर गरमागरम चर्चा झाली. (प्रतिनिधी)
शहराची लोकसंख्या वाढली, वाहने वाढली, रस्त्यांवर अतिक्रमणे वाढलेली असताना शहर वाहतूक पोलिसांची संख्या मात्र अपुरी आहे. त्यामुळे आम्ही तरी काय करणार? दिवसा जड वाहन शहरात येणार नाही, याबाबत आमचे प्रयत्न आहेत. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याच्या पलीकडे गेला आहे. लोकांनाही शिस्त नाही. वाहतूक शाखेला दिलेले कर्मचारी प्रशिक्षित नसल्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यात तेही कमी पडत आहेत. पोलिसांमुळेच जड वाहने शहरात येतात, असे आरोप केले जातात. तरीही ७० टक्के वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे.
- ज्ञानेश्वर ढोकले, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
सकाळी आठ ते रात्री आठ या दरम्यान शहरातून जड वाहने बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. दिवसा जड वाहने बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांचा माल शहरात येण्याबाबत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांची काय मतं आहेत, याबाबत चर्चा करून बारा तास वाहनांना बंदी घालण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. बाह्यवळण रस्ता दुरुस्ती, शहरातील बंद सिग्नल, पार्किंगचे पट्टे, अतिक्रमणे काढणे,अवैध प्रवासी वाहतूक, रस्त्यावरील पंक्चर काढणे, स्पीड ब्रेकर बसविणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. बेकायदेशीर रिक्षांची संख्या वाढते आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
-विलास कांबळे, आरटीओ, नगर

Web Title: Banned for 12 hours heavy vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.