केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शरद पवारांवर ईडीची कारवाई-बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:14 IST2019-10-18T12:14:10+5:302019-10-18T12:14:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. राज्यातीेल जनतेला हे बिलकूल आवडलेले नाही, असे मत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शरद पवारांवर ईडीची कारवाई-बाळासाहेब थोरात
विशेष मुलाखत - अतुल कुलकर्णी / सुधीर लंके ।
संगमनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. राज्यातीेल जनतेला हे बिलकूल आवडलेले नाही, असे मत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत केलेल्या विधानाकडे तुम्ही कसे पाहता?
राजकारणात असताना मनात जे येते ते बोललेच पाहिजे असे नाही. पण शिंदे हे मोकळ्या मनाचे आहेत. सुशीलकुमार यांनी असे बोलण्याची गरज नव्हती.
आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अनेक जण कॉँग्रेस सोडून गेले असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला
मी प्रदेशाध्यक्ष नसताना विखे पाटील कॉँग्रेस सोडून गेले याचा कदाचित त्यांना विसर पडला असेल. पक्ष सोडून जाण्याची सुरवात त्यांनी केली आहे. त्यामुळे अशा गोष्टी त्यांच्या तोंडी शोभत नाहीत.
विखे यांच्या मुलाला तुम्ही खासदारकीचे तिकीट देऊ शकला नाहीत म्हणून ते सोडून गेले...?
विखे पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. मात्र, आपण कोणासोबत जात आहोत त्यांची विचारसरणी काय, आपली काय याचा सारासार विचारही त्यांनी केला नाही. पक्ष सोडून जाण्याची लाट काही मोजक्या नेत्यांमध्ये असली तरी सर्वसामान्यांना ते आवडलेले नाही. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणारे उंदरांसारखे असतात असे विधान केले होते. या विधानानंतर भाजपमध्ये गेलेल्या अन्य पक्षातील नेत्यांची काय अवस्था असेल हे त्यांनी समजून घ्यावे.
तुम्हाला प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिले पण ते संगमनेरमध्येच पडून आहे. विखे म्हणतात तसे तुम्हाला मतदारसंघ सोडणे अशक्य झाले आहे?
त्यांची माहिती अर्धवट आहे. माझ्याकडे हेलिकॉप्टरच नाही, अखिल भारतीय कॉंग्रेसने फिरण्यासाठी विमान देखील दिले आहे. मी राज्यभर फिरतो. त्याचा तपशील उपलब्ध आहे. खरे तर ते विरोधी पक्षनेते होते. आता मंत्री आहेत. त्यांनी फिरायला पाहिजे होते. पण ते केवळ जिल्ह्यात तीन तालुक्यांत फिरत आहेत. स्वत:ची त्यांनी वाईट अवस्था करून घेतली आहे.
पक्षातल्या आउटगोर्इंगमुळे कॉँग्रेसला नुकसान होईल का?
असे बिलकुल नाही. ज्या ज्या वेळी कॉँग्रेस संपली असे बोलले गेले त्या त्या वेळी कॉँग्रेस नव्याने जिवंत झाली आहे. या आधी इंदिरा गांधी यांच्यापासून ते विलासराव देशमुख यांच्या पर्यंतचा इतिहास साक्षी आहे. उलट अनेक वर्ष ज्यांनी मतदारसंघ आडवून ठेवले होते. ते निघून गेले त्याचा फायदा आम्हालाच होईल. त्या जागी नव्या चेहºयांना आम्हाला संधी देता आली याचा चांगला परिणाम निकालात पहावयास मिळेल.
सध्या ‘शरदपर्व’ सुरु आहे, असा उल्लेख तुम्ही करता
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र बांधला होता. मुख्यमंत्री नसतानाही त्यांची राज्यावर छाप होती. अलीकडच्या कालखंडात शरद पवार यांची प्रतिमा तशी आहे. सर्वांना ते मदत करतात. त्यामुळे पहिल्या कालखंडाला ‘यशवंतपर्व’ तर दुस-या कालखंडाला ‘शरदपर्व’ म्हणालो.
विखे यांनी संघाच्या वळचणीला जायला नको होते
राधाकृष्ण विखे यांना पक्षाने विरोधी पक्षनेते पद दिले. त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेचे दोनदा अध्यक्षपद दिले. त्यांचे साम्राज्य पक्षाच्या जोरावर उभे आहे. अशावेळी केवळ लोकसभेची जागा सोडली नाही म्हणून विखेंनी कॉंग्रेस सोडायला नको होती. त्यांनी स्वत:हून थांबायला हवे होते. विचारसरणी सोडून संघाच्या वळचणीला जाणे त्यांना शोभणारे नाही. पक्ष अडचणीत असताना त्याग करणे महत्त्वाचे असते. त्यातून त्यांचा सन्मान वाढला असता, असे थोरात म्हणाले.
राष्ट्रवादीच्या मतदारसंघातही आमचा प्रचार
राष्ट्रवादी खूप चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहे. आम्ही एकमेकांच्या मतदारसंघात सभा घेत आहोत. मी आज अकोले मतदारसंघात सभांना जात आहे. आम्ही दोघे मिळून सत्ता मिळवू,
जिल्ह्यात १२-० अशी परिस्थिती निर्माण करु असा विखे यांचा दावा आहे
जिल्ह्यात याच्या उलट आकडे दिसणार नाहीत याची त्यांची काळजी घ्यावी.
कॉंग्रेसला जिल्ह्यात तीनच मिळाल्या असाही आरोप विखे करतात
विखे पक्षात होते तेव्हापासून एवढ्याच जागा होत्या. राज्यात दीडशे जागा घेतल्या हे का ते सांगत नाहीत. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून साडेचार वर्षे पक्षाचे नुकसान केले. मी तीन महिन्यात पक्ष सावरण्याचे काम केले. त्यांनी जी वाईट अवस्था करुन ठेवली ती सुधारण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.