बायजामाता मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:42+5:302021-04-02T04:20:42+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. जेऊर गावचे आराध्य दैवत ...

बायजामाता मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
जेऊर गावचे आराध्य दैवत देवी बायजामाता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकवर्गणीतून चार वर्षांपूर्वी सुरू केले होते. ३ कोटी रुपये खर्चून हेमाडपंथी भव्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये उंच टेकडीवर असणारे भव्य मंदिर पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
जेऊर येथील देवी बायजामाता देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे राज्य तसेच परराज्यातून भक्त दर्शनासाठी येत असतात. देवीची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. वैशाख बौद्ध पौर्णिमेला मोठा यात्रोत्सव भरत असतो.
बायजा माता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकवर्गणीतून करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले. गावातील सर्वच नागरिकांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी आपापल्यापरीने मदत केली. तसेच बाहेरील देवीच्या भक्तांनीही मंदिरासाठी सढळ हाताने मदत केली. जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात असून रंग देण्याचे काम सुरू आहे. मंदिरासमोर भव्य असे व्यासपीठ बनविण्यात आलेले आहे.
जेऊर परिसरामध्ये सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात तसेच विवाह सोहळ्यात सत्कार व अवांतर खर्चाला फाटा देऊन मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत करण्याचा नवीन पायंडा पडलेला आहे.