भाळवणी-दैठणे गुंजाळ रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:07+5:302021-07-16T04:16:07+5:30
भाळवणी : गेल्या काही वर्षांपासून भाळवणी ते दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांना या ...

भाळवणी-दैठणे गुंजाळ रस्त्याची दुरवस्था
भाळवणी : गेल्या काही वर्षांपासून भाळवणी ते दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांना या रस्त्याने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या कामाची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या रस्त्यावर भाळवणी पासून एक किमी अंतरावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्री - अपरात्री या रस्त्याने जाताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा करावा लागतो. पाऊस झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोटारसायकल चालविताना ही मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू असल्याने याठिकाणी येताना-जाताना छोटे-मोठे अपघातही होतात. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विजेचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून या रस्त्यावर पथदिव्यांची ही अनेक दिवसांपासून मागणी असताना ग्रामपंचायत प्रशासन व वीज वितरण कंपनीचे ही दुर्लक्ष होत आहे.
----
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मानसी मानूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील आठवड्यात पाच दिवस वीज नसल्याचे सांगितले. वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विजेअभावी येथे काम करताना अनेक अडचणी येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
----
१५ भाळवणी रस्ता
भाळवणी - दैठणे गुंजाळ रस्त्याची झालेली दुरवस्था (छायाचित्र : अभिजित कपाळे)