चित्रातून उलगडणार बाबांचे चरित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:33+5:302021-03-20T04:18:33+5:30
वर्धा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त कलाशिक्षक हरिभाऊ गुजर यांनी अवतार मेहेरबाबांच्या भक्तिमार्गावर प्रभावित होऊन त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण ...

चित्रातून उलगडणार बाबांचे चरित्र
वर्धा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त कलाशिक्षक हरिभाऊ गुजर यांनी अवतार मेहेरबाबांच्या भक्तिमार्गावर प्रभावित होऊन त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण प्रसंगांना आपल्या चित्रशैलीतून जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी मेहेरबाबांवर लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकांचा अभ्यास केला. त्यातून काही निवडक संदर्भ घेऊन गुजर यांनी मेहेरबाबांचे जीवनचरित्र पुस्तकरूपात रेखाटण्याचे ठरवले. मेहेरबाबांच्या जीवनातील ४० प्रसंगांना त्यांनी आपल्या चित्रकौशल्यातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील ७२ देशांत अवतार मेहेरबाबांचे अनुयायी आहेत. त्यांच्या जीवनचरित्राचा व भक्तिमार्गाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी आपले सहकारी प्रा. विकास काळे यांच्या प्रेरणेने व सहकार्याने त्यांनी बाबांचे जीवन चित्ररूपात प्रकाशित केले.
बाबांची समाधी असलेल्या अरणगाव (मेहेराबाद, ता. नगर) येथे बाबांचे नातू मेहेरानाथजी यांच्या हस्ते त्यांनी या अल्बमचे नुकतेच प्रकाशन व विमोचन केले.
मुखपृष्ठावर सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा संदेश चित्रित केला आहे. यात बाबांचे आईवडील, त्यांचे गुरू, त्यांचे कार्य, प्रेमाची शिकवण देणारे संदेश आदी प्रसंग या अल्बममध्ये समाविष्ट आहेत.
........
अवतार मेहेरबाबांच्या प्रेमाच्या शिकवणीमुळे मी प्रभावित झालो. माझ्याकडे असणा-या चित्रकलेचा उपयोग करून बाबांचा जीवनपट चित्ररूपात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जीवनचरित्राला यातून उजाळा मिळण्यास मदत होईल. त्यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार यातून होईल.
-हरिभाऊ गुजर, चित्रकार, वर्धा
........
वर्धा येथील चित्रकार गुजर यांनी अवतार मेहेरबाबांच्या जीवनावरील अल्बम चित्ररूपात त्यांनी प्रकाशित केला. बाबांच्या जीवनचरित्राला उजाळा मिळाला आहे. बाबांचे कार्य यामुळे त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
- रमेश जंगले, विश्वस्त, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट