गरीब रुग्णांस जीवनदान देणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:19 IST2021-04-15T04:19:24+5:302021-04-15T04:19:24+5:30
बोधेगाव येथील हर्षल वारकड (वय २५) हा तरूण एक वर्षापासून व्यवसायानिमित्त पुणे याठिकाणी स्थायिक आहे. मागील आठवड्यात सोमवारी पुणे ...

गरीब रुग्णांस जीवनदान देणारा अवलिया
बोधेगाव येथील हर्षल वारकड (वय २५) हा तरूण एक वर्षापासून व्यवसायानिमित्त पुणे याठिकाणी स्थायिक आहे. मागील आठवड्यात सोमवारी पुणे येथील ससून रुग्णालयात एका गरीब रुग्णास शस्त्रक्रियेदरम्यान अचानक एबी निगेटिव्ह रक्त गटाची गरज होती. रक्तपेढीतून सहा बॅग रक्त मिळवण्यासाठी लागणारी पुरेशी रक्कम त्या रुग्णाकडे नव्हती. यावेळी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून कांबी येथील माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्व जनआरोग्य सेवा समितीचे आरोग्यदूत कृष्णा महाराज कुऱ्हे यांना माहिती समजली. त्यांनी तातडीने प्रतिष्ठानचे सदस्य हर्षल वारकड यांना फोन करून याविषयी कल्पना दिली. तेव्हा हर्षल याने हातचे काम सोडून मित्र सुमित कल्याणकर याच्यासह तत्काळ रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. अवघ्या दहा मिनिटांत तिथे पोहचून त्या गरजू रुग्णासाठी रक्त देऊ केले. वेळेवर रक्त मिळाल्याने त्या रुग्णाच्या तुटलेल्या हाताची यशस्वी शस्त्रक्रिया होऊ शकली. हर्षल व सुमितने तत्परतेने केलेल्या या मदतीसाठी रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
माणुसकी प्रतिष्ठानचे कृष्णा महाराज कुऱ्हे, संतोष नेमाने, सुरेंद्रकुमार बानाईत, मुनवर शेख, सोमनाथ पौळ, रविराजे गायकवाड आदींसह ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.