वीजबिल माफीसाठी जामखेड महावितरण कार्यालयास ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:44 IST2020-09-11T14:43:23+5:302020-09-11T14:44:00+5:30
नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे मागील ४ महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे.

वीजबिल माफीसाठी जामखेड महावितरण कार्यालयास ठोकले टाळे
जामखेड : कोरोना साथीच्या या भीषण संकटांच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे मागील ४ महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे, या मागणीसाठी जामखेड येथे आम आदमी पक्षाच्या वतीने विद्युत कार्यालयासमोर आंदोलन करुन टाळे ठोकण्यात आले.
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारकडून सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने जामखेड येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक संतोष नवलाखा, जामखेड संयोजक बजरंग सरडे, सुंदर परदेशी, अजय भोसले, गणेश गवसणे, स्वानंद कुलकर्णी, नंदु गंगावणे, सुनिल कांबळे, बापु कुलकर्णी, महेश बोरकर, ॲड. बिपीन वारे, वसीम खान, जिलानी शेख, समीर पठाण, कदिर पठाण, बाळु बळे, कांतीलाल कवादे, बाळु सुर्वे, काका रायकर आदी या आंदोलनात सामील झाले होते.
शिवसेनेने निवडणुकीत तब्बल ३०० युनिट पर्यंतचे वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. १०० युनिटपर्यंत माफी विषयी उर्जा मंत्री बोलत होते. ते आश्वासन पाळलेलेच नाही. पण किमान या संकट काळात तरी त्याची आठवण ठेवत सामान्य जनतेचे वीज बिल माफ करावे.
-संतोष नवलाखा, जिल्हा संयोजक, आदमी पार्टी.