उपाययोजना करून नागरिकांच्या जीवितास होणारा धोका टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:17 IST2021-04-03T04:17:06+5:302021-04-03T04:17:06+5:30
कोपरगाव : शहरासह व तालुक्यातील गावांमध्ये संशयित रुग्णांच्या चाचणीचा उशिरा येणारा अहवाल आणि विलगीकरण होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ ...

उपाययोजना करून नागरिकांच्या जीवितास होणारा धोका टाळा
कोपरगाव : शहरासह व तालुक्यातील गावांमध्ये संशयित रुग्णांच्या चाचणीचा उशिरा येणारा अहवाल आणि विलगीकरण होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यातून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने विलगीकरण कक्षाची तत्काळ व्यवस्था करून कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास होणारा धोका टाळावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे गुरुवारी (दि. १ एप्रिल) निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हे म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून सुरळीतपणे सुरू असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. दिवसागणिक रूग्ण वाढत आहेत. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आह. त्यामध्ये प्रामुख्याने संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर अहवाल येण्यास चार - पाच दिवसांचा कालावधी लागतो. या विलंबाच्या काळात सदरचा संशयित रूग्ण हा समाजव्यवस्थेच्या संपर्कात येऊन होणाऱ्या प्रसारातून रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वास्तविक संशयित रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतु, ती सुविधाच नसल्याने तालुका व शहरभर रूग्णसंख्येच्या आकड्यात दिवसेंदिवस भर पडत आहे.