जामखेडच्या युवकाने बनविले आग विझविणारे स्वयंचलित यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:11+5:302021-01-13T04:54:11+5:30
अहमदनगर : जामखेड येथील युवकाने अत्याधुनिक आग विझविणारे स्वयंचलित यंत्र बनिवले आहे. ज्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते, ...

जामखेडच्या युवकाने बनविले आग विझविणारे स्वयंचलित यंत्र
अहमदनगर : जामखेड येथील युवकाने अत्याधुनिक आग विझविणारे स्वयंचलित यंत्र बनिवले आहे. ज्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे यंत्र ठेवल्यास काही सेेकंदात आग विझते, हे ठिकठिकाणी झालेल्या प्रात्यक्षिकांद्वारे समोर आले आहे. हे यंत्र तमिळनाडूतील एक हजार शाळांमध्ये बसविण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योजक पंकज शेळके यांनी दिली.
आगीमुळे मोठी हानी होते. ती होऊ नये, आग पसरण्याआधीच ती नियंत्रणात कशी येईल, यावर संशोधन केले. हे संशोधन सुमारे दोन वर्षे सुरू होते. काही सेकंदात आग विझणार असे स्वयंचलित रेडमॅटिक हे अग्निशमन यंत्र तयार करण्यात यश आले. विशेष म्हणजे विविध ठिकाणी झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये हे यंत्र आग विझविण्यात यशस्वी झाले. ज्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी हे यंत्र ठेवले जाते. जिथे हे यंत्र ठेवलेले आहे, अशा ठिकाणी आग लागल्यास आगीच्या ज्वाला या सेन्सरला स्पर्श करतात. एकदा सेन्सर कार्यान्वित झाले की यंत्र फुटते. हे यंत्र फुटून पावडर बाहेर फवारली जाते. ही पावडर बाहेर पडल्यानंतर आग काही सेेकंदात नियंत्रणात येते. त्यामुळे आग पसरत नाही. परिणामी पुढील दुर्घटना टळते.
आग विझविणारे हे पूर्णपणे स्वयंचिलत यंत्र आहे. त्यामुळे हे यंत्र इलेक्ट्रिकल पॅनल, स्वीच, बोर्ड, मीटर बॉक्स, आदी ठिकाणी ठेवता येते. आग केव्हाही लागली तरी ती आपोआप विझली जात असल्याचे प्रत्याक्षिकांद्वारे समोर आल्याचे शेळके म्हणाले.
....
नगर शहरातील रुग्णालयातील दुर्घटना टळली
नगर शहरातील एका रुग्णालयातील इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये हे यंत्र बसविण्यात आले होते. या रुग्णालयातील पॅनलमध्ये रात्रीच्यावेळी अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. रुग्णालयातील ज्या पॅनल बॉक्समध्ये आग लागली, त्या ठिकाणी हे यंत्र होते. आग लागल्यानंतर ते काही क्षणात फुटले. त्यातील पावडर बाहेर पडल्याने आग काही सेकंदात विझली गेल्याचे शेळके यांनी सांगितले.