शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:04 IST2020-05-06T11:03:24+5:302020-05-06T11:04:29+5:30

पाथर्डी : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी गावच्या शिवारात घडली ...

Atrocities on a minor girl who went to graze goats; Accused arrested | शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

पाथर्डी : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी गावच्या शिवारात घडली आहे. ही घटना २ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 
पोलीस सूत्राची माहिती अशी की, पंधरा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी ही वीस दिवसांपूर्वी दोन शेळ्या चारण्यासाठी माणिकदौंडी गावाच्या शिवारात गेली होती. याचवेळी आरोपी शाहरुख बेग हा देखील शेळ्या चारण्यासाठी तेथे आला होता. यावेळी बेग याने बळजबरीने मुलीवर अत्याचार केला. याविषयी घरी काही सांगशील तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने मुलीला धमकी दिल्याने तिने घरी काहीही सांगितले नाही. मात्र पुन्हा दहा दिवसांनी असाच प्रकार घडला. त्यावेळी देखील पीडित मुलगी घाबरलेली होती. त्यानंतर २ मे रोजी पुन्हा तिस-यावेळी संबंधित आरोपीने मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरड केल्यामुळे बाजूच्या शेतात असणा-या काही शेतक-यांनी धाव घेऊन सदर मुलीची सुटका केली. त्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपी शाहरुख शाम्मद बेग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे करीत आहेत.

Web Title: Atrocities on a minor girl who went to graze goats; Accused arrested