यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या;आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 22:59 IST2020-11-30T22:54:57+5:302020-11-30T22:59:58+5:30
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या;आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (ता.पारनेर) सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हल्ला झाल्यानंतर जरे यांना तत्काळ नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
जरे या सोमवारी कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या. पुणे येथून कारने नगरकडे येत असताना जातेगाव फाटा नजिक मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडविले. यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात गंभीरित्या जखमी झालेल्या जरे यांना काही वेळातच नगरच्या जिल्हा रुग्णालयात दखल केले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे त्यांनी सांगितले.