अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:01+5:302021-01-03T04:22:01+5:30

लोकमत नूज नेटवर्क शेवगाव : कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना पाठवण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचे डबीतच पाणी झाल्याचा धक्कादायक ...

Arsenic album pills became water | अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी

अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी

लोकमत नूज नेटवर्क

शेवगाव : कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना पाठवण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचे डबीतच पाणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडून आणलेल्या ‘त्या’ गोळ्यांबाबत संशय निर्माण झाला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यावर नागरिकांनी गोळ्या घेण्यास विरोध दर्शवत गलथान कारभारावर संताप व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायतीच्या १४ वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज जिल्हा परिषदेने जमा करून घेतले. त्यावेळी ग्रामपंचायतीला रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्या पाठविणार असल्याचे पाच महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेकरिता सुमन होमिओ फार्मसी (पुणे) या कंपनीमार्फत शेवगाव पंचायत समितीला तालुक्यातील ग्रामपंचायतींना वाटण्यासाठी प्लास्टिक पिशव्यात अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांच्या डब्या पाठवल्या. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, सरपंचांना ‘त्या’ गोळ्या घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीचे चतुर्थश्रेणी कर्मचारी बबन बोरुडे यांनी ३१ डिसेंबर रोजी पंचायत समितीमधून ‘त्या’ गोळ्यांचे पाकीट आणले.

...

गोळ्या न खाण्याचा सल्ला

दरम्यान शनिवारी (दि.२) ग्रामपंचायतींचे सरपंच व अन्य कर्मचाऱ्यांनी आशा सेविकांमार्फत गोळ्या वाटप करण्यास सुरुवात करताना पहिले पाकीट फोडले. तर त्यात भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश भलसिंग यांना डबीत गोळ्या नसून पाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अन्य डब्या तपासल्या असता बहुतांश डब्यांत पातळ पाण्यासारखा द्रव तर काही डब्यांत साखरेच्या पाकासारखा दिसणारा द्रव तर काही डब्यांत घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ दिसून आला. याबाबत भलसिंग यांनी काही वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांना याबाबत फोन करून कळवले असता, त्यांनी त्या गोळ्या घेऊ नका, असा सल्ला दिला.

....

१४ पाकिटांतील गोळ्या खराब

दरम्यान ही बाब वाघोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्यामार्फत वरिष्ठ पातळीवर गेली असता त्यांना ‘ते’ पाकिटे पुन्हा आणावेत यासाठी सांगितले गेले. मात्र, ग्रामस्थांनी कडकडून विरोध केल्यावर त्यांनी ‘ती’ पाकिटे ताब्यात घेण्याचे टाळले. वाघोली ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी वाटप करण्यासाठी आणलेल्या १४ पाकिटांतील डब्या उघडल्या असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या खात्यावर तब्बल पाच महिन्यांपूर्वी १ लाख ४८ हजार ७६० रुपये इतकी रक्कम सदर गोळ्यासाठी जमा केली होती. वाघोली ग्रामपंचायतीच्या २ हजार ९०३ लोकसंख्येच्या गावात १४ पाकिटे पाठविण्यात आली आहेत.

...

फोटो-०२शेवगाव गोळ्या

...

Web Title: Arsenic album pills became water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.