पत्रकारावर वाळू तस्करांचा सशस्त्र हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:16+5:302021-09-09T04:27:16+5:30
श्रीगोंदा : येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना सहा वाळू तस्करांनी लोखंडी रॉडने मारहाण करत एक लाखाची ...

पत्रकारावर वाळू तस्करांचा सशस्त्र हल्ला
श्रीगोंदा : येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना सहा वाळू तस्करांनी लोखंडी रॉडने मारहाण करत एक लाखाची खंडणी मागितली. दोघांनी पिस्तूलचा धाक दाखवून एक लाखाची खंडणी मागितली आहे आणि कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास येळपणे शिवारात घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
मंगळवारी सायंकाळी प्रमोद आहेर हे येळपणे येथील खंडेश्वर कॉम्प्युटर बंधूचे दुकान बंद करून घराकडे जात होते. त्यावेळी येळपणे-पिसोरे रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ
एक कार उभी होती. त्या कारमधील सुनील उर्फ प्रेम रामदास जाधव, बबन भाऊसाहेब घावटे यांच्यासह चार ते सहा जणांनी पत्रकार प्रमोद आहेर यांना अडविले. तू आमचे लोकेशन पोलिसांना देतो, आमच्या बातम्या पेपरमध्ये छापतो, आम्हाला तू ओळखत नाही का? असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी काहींनी दारूच्या बाटल्या त्यांच्या डोक्यावर, पाठीवर फोडल्या. दोघांनी डोक्याला पिस्तूल लावत एक लाख रूपये दे नाही तर तुला सोडणार नाही. खिशात हात घालत सात हजाराची रोकड काढून घेतली. जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसात तक्रार केली तर तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही, अशी त्यांनी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.
या प्रकरणातील फरारी वाळू तस्करांना तातडीने अटक करावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर पत्रकार संघ आंदोलन करीन, अशी माहिती मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी दिली.