लिपिकाची नियुक्ती; २८ हजार पगार!
By Admin | Updated: August 19, 2014 23:32 IST2014-08-19T23:24:43+5:302014-08-19T23:32:37+5:30
अहमदनगर: केंद्र सरकारच्या राजीव गांधी आवास योजनेतील लिपिक पदासाठी आपली नियुक्ती झाली असून प्रशिक्षणासाठी १५ हजार ३०० रुपयांची अनामत रक्कम बँकेत भरणा करा असा भुलभुलैय्या सध्या सुरु आहे.

लिपिकाची नियुक्ती; २८ हजार पगार!
अहमदनगर: केंद्र सरकारच्या राजीव गांधी आवास योजनेतील लिपिक पदासाठी आपली नियुक्ती झाली असून प्रशिक्षणासाठी १५ हजार ३०० रुपयांची अनामत रक्कम बँकेत भरणा करा असा भुलभुलैय्या सध्या सुरु आहे. या फसवणुकीबाबत दस्तुरखुद्द सरकारने वेबसाईटवर खुलासा केल्यानंतरही फसवणूक सुरुच आहे.
राजीव गांधी आवास योजना ही केंद्र सरकारची योजना असून याअंतर्गत आगामी दहा वर्षांत शहरातील दारिद्रय रेषेखालील सर्व नागरिकांसाठी मोफत घरे उपलब्ध करावयाची आहेत. या योजनेसाठी लिपिक पदाची भरती करावयाची आहे अशी जाहिरात विविध राज्यांत प्रसारित करण्यात आली आहे. या पदासाठी बारावी ही शैक्षणिक पात्रता देण्यात आली असून २८ हजार ५०० असे भरभक्कम वेतन दाखविण्यात आले आहे. शिवाय उमेदवारांना निवड झाल्यानंतर तत्काळ दहा लाखांचे कर्ज, निवासाची व्यवस्था, पदोन्नतीची संधी अशी अनेक आमिषे दाखविण्यात आली आहेत. या जाहिरातीला भुलून अनेक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अशा उमेदवारांना आता संबंधितांकडून नियुक्ती पत्रही पाठविण्यात आली आहेत. आपली निवड झाली असून योजनेच्या प्रशिक्षणासाठी आपण तत्काळ बँकेत १५ हजार ३०० रुपयांची अनामत रक्कम भरावी. त्यानंतरच आपली निवड निश्चित होईल असे दूरध्वनी संबंधितांकडून केले जात आहेत. अनेक तरुणांनी बँकेत अशा पैशांचा भरणा केला असून ते फसले गेले आहेत.
केंद्र सरकारलाही या फसवणुकीबाबत माहिती मिळाली असून सरकारने आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करुन अशी कुठल्याही प्रकारची भरती सुरु नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तरीदेखील फसवणुकीचा प्रकार सुरुच आहे.
राजीव आवास योजनेच्या भरतीचा भुलभुलय्या: हजारो तरुणांची फसवणूक
दिल्ली, पुण्यात कार्यालये
भरतीसाठी ज्या भ्रमणध्वनीवरुन उमेदवारांना संपर्क केला जात आहे ती व्यक्ती आपण दिल्लीहून बोलत असल्याचे सांगत आहे. महाराष्ट्रात आमचे पुण्यात कार्यालय आहे. मात्र कार्यालयात न जाता बँकेतील खात्यावर अगोदर अनामत रक्कम भरा असे सांगितले जाते.