पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव
By Admin | Updated: May 20, 2016 23:56 IST2016-05-20T23:53:49+5:302016-05-20T23:56:36+5:30
अहमदनगर : वाहतूक पोलिसांच्या मनमानीने कळस गाठला असून, वर्गणी न देणाऱ्यांची धरपकड जोरात सुरू आहे़ त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसविले आहेत़

पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव
अहमदनगर : वाहतूक पोलिसांच्या मनमानीने कळस गाठला असून, वर्गणी न देणाऱ्यांची धरपकड जोरात सुरू आहे़ त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसविले आहेत़ काही रिक्षाचालकांवर टार्गेट करून त्यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे़ पोलिसांच्या या मनमानीकडे वरिष्ठांनीही डोळेझाक केली आहे, हे विशेष!
शहरात चार हजारांहून अधिक विनापरवाना पॅगो रिक्षा आहेत़ रितसर परवाना देण्याची त्यांची मागणी आहे, मात्र ती मिळत नाही़ परवाना मिळत नाही म्हणून रिक्षा उभी करून चालत नाही़ रिक्षा उभी ठेवली तर खायचे काय, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर आहे़ संसाराचा गाडा चालविण्यासाठी काहीजण प्रवाशी वाहतूक करतातही़ पण, दिवसभराची कमाई पोलिसांच्या हवाली करावी लागते, असा त्यांचा अनुभव आहे़ पोलिसांचे हे धोरण काही सगळ्यांसाठीच आहे, असेही नाही तर ठराविक रिक्षा चालकांसाठीच हे नियम आहेत़ इतरांना मात्र रान मोकळे आहे़ पोलीस ठाण्यातून कारवाईसाठी बाहेर पडण्याआधीच कारवाई करण्याचे नियोजन होते़
कुणावर कारवाई करायची आणि कुणाला सूट द्यायची, हे आधीच ठरलेले असते़ कारवाईच्या इराद्याने चारचाकी वाहनातून आलेले हे त्रिकूट दंडाच्या नावाखाली सर्रास वसुली करत असल्याची तक्रार आहे़ वाहन सोडविण्यासाठी चालक गेल्यास त्यांना साहेब नाहीत, नंतर या, पावती करतो, असे सांगून रिक्षा सोडविण्यास टाळाटाळ करतात़ काहीवेळा तर हजार रुपये घेऊन शंभराचीच पावती हातावर टेकविली जाते, असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे़
परवानाधारक पॅगोरिक्षा चालकांना तीन प्रवाशी वाहतूक करण्याची मुभा आहे़ मात्र, पोलिसांची बडदास्त ठेवणाऱ्यांना सर्वकाही माफ असते़ त्यांच्या रिक्षांवर कारवाई तर दूरच, पण अशा रिक्षांना पोलीस हातही करत नाहीत़ त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात़ असे रिक्षा चालक जोरात निघून जातात़ त्यांच्यावर कारवाई होत नाही़ इतरांना मात्र पोलिसांच्या खाकीचे दर्शन होते़ त्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालक वैतागले आहेत़ (प्रतिनिधी)