सत्ताधारी-विरोधक आमने सामने
By Admin | Updated: August 12, 2014 23:20 IST2014-08-12T23:16:55+5:302014-08-12T23:20:34+5:30
नेवासा : नेवासा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या होऊ घातलेल्या उद्घाटन समारंभाचे भांडवल करीत विरोधक व सत्ताधारी आमने-सामने उभे ठाकल्याने पंचायत समितीचा परिसर मंगळवारी दुपारी गजबजून गेला होता.

सत्ताधारी-विरोधक आमने सामने
नेवासा : नेवासा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या होऊ घातलेल्या उद्घाटन समारंभाचे भांडवल करीत विरोधक व सत्ताधारी आमने-सामने उभे ठाकल्याने पंचायत समितीचा परिसर मंगळवारी दुपारी गजबजून गेला होता. विरोधकांनी बुधवारी उद्घाटन होऊ नये म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना घेरावो घातला. तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना जाब विचारला यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. काहींनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
नेवासा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत २ कोटी ४८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. या इमारतीचा उद्घाटन समारंभ १३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते करण्याचे ठरले. त्याच्या पत्रिकाही वाटण्यात आल्या. मंगळवारी या इमारतीच्या गृहप्रवेशासाठी मुख्य प्रवेशद्वारावर कलशपूजनासह इतर विधी पं.स. सदस्या विमलताई बहिरट व बापूराव बहिरट, सविता शिंदे व संजय शिंदे यांच्या हस्ते विधीवत पूजेने करण्यात आला. पूजा सुरू असतानाच मुख्य विरोधक बाळासाहेब मुरकुटे, पं.स. सदस्य जानकीराम डौले, जनार्दन जाधव, शिवसेनेचे गोरक्षनाथ घुले, भाजपचे युवा नेते अनिल ताके, मनसेचे नेते दिलीपराव मोटे, साहेबराव घाडगे, अंबादास लष्करे, किरण शिंदे, संजय माळवदे या प्रमुख कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी रामकृष्ण कर्डिले व सा.बां.चे उपअभियंता संजीवकुमार कोकणे यांना घेराव घालून इमारत उद्घाटनाचा ठराव नसताना उद्घाटन करण्याचा घाट का घातला जात आहे? याबाबत जाब विचारला. याबाबत लेखी देण्याच्या तयारीत असलेले गटविकास अधिकारी हतबल झाले. यानंतर आ.गडाख समर्थकांनी घोषणाबाजी करीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. यातील काही विरोधकांनी काढता पाय घेतला. एकमेकांना,‘ तुम्ही काय केले?’ असा जाब विचारत असतानाच वातावरण आणखीनच तापले. काहींनी मध्यस्थी करीत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले.
(प्रतिनिधी)
गटविकास अधिकाऱ्यांना घेराव
याबाबत पं.स. सदस्य जानकीराम डौले, बाळासाहेब मुरकुटे, अनिल ताके यांनी संयुक्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पंचायत समितीच्या बैठकीत कोणताही ठराव न घेता प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करणे अयोग्य आहे म्हणून याचा जाब विचारण्यासाठी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. सत्ताधारी राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
यावेळी सभापती कारभारी जावळे यांच्याशी चर्चा केली असता उद्घाटनाचा ठराव मासिक सभेत घेतला आहे. पंचायत समितीत जागेची कमतरता असल्यामुळे आचारसंहितेपूर्वी या इमारतीचे उद्घाटन करून काही कार्यालये नूतन इमारतीत हलविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
घाडगे, मोटे यांचा काढता पाय
४पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी येथे आलेले साहेबराव घाडगे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनाला विरोध करता, जनतेच्या प्रश्नाबाबत का समोर येत नाही? असा जाब विचारला. नियोजित साखर कारखान्यासाठी गोळा केलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा, अशी जमावाने मागणी करताच त्यांनी गाडीत बसून काढता पाय घेतला. हा आरडाओरडा बघताच मनसेचे दिलीप मोटे यांनीही पंचायत समितीच्या आवारातून निघून जाणे पसंत केले.