शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याकरिता अंगणवाडी कर्मचारी आक्रमक; संगमनेरात प्रांत कचेरीवर मोर्चा
By शेखर पानसरे | Updated: December 13, 2023 15:53 IST2023-12-13T15:53:34+5:302023-12-13T15:53:43+5:30
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याकरिता अंगणवाडी कर्मचारी आक्रमक; संगमनेरात प्रांत कचेरीवर मोर्चा
संगमनेर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी मिळावी. मिळणाऱ्या मानधनात वाढ होऊन ते वेतन स्वरुपात मिळावे. तसेच सेविकांना दरमहा २६ हजार रुपये तर मदतनिसांना २० हजार रुपये इतके वेतन मिळावे. यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.१३) येथील प्रांत कचेरीवर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
सभेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी येथे कार्यरत असलेल्या सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शहरातील नेहरू उद्यानापासून सुरू झालेला मोर्चा प्रांत कचेरीवर नेण्यात आला. आमच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, त्यावर आतापर्यंत सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. असे मोर्चात सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सांगितले. त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.