जामखेड नगरपरिषदेने भरली पन्नास लाख रुपयांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 17:57 IST2017-08-23T17:49:59+5:302017-08-23T17:57:22+5:30
अहमदनगर : पथदिवे व पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाची रक्कम जामखेड नगरपरिषदेने महावितरणकडे जमा केली. थकीच ५० लाख रुपयांचा नुकताच भरणा केला

जामखेड नगरपरिषदेने भरली पन्नास लाख रुपयांची थकबाकी
अहमदनगर : पथदिवे व पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाची रक्कम जामखेड नगरपरिषदेने महावितरणकडे जमा केली. थकीत ५० लाख रुपयांचा नुकताच भरणा केला. इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यअभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
जामखेड नगर परिषदेकडे पाणीपुरवठा योजना व पथदिव्याची एकूण ६१ लाख ७९ हजार ६१० रुपयांची थकबाकी होती. महावितरणच्या जामखेड उपविभागीय कार्यालयाने थकीत रकमेचा भरणा व्हावा, यासाठी नगर परिषदेकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नगरपरिषदेने ५० लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी कापडणीस यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश प्रभारी उपकार्यकारी अभियंता युवराज परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक एम. बी. ताकपिरे, सहाय्यक अभियंता हिरामण गावित, कनिष्ठ अभियंता वैभव थोरे उपस्थित होते. पारनेर नगरपंचायतीनेही पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीपोटी मंगळवारी (२२ आॅगस्ट) १९ लाख ८७ हजार रुपयांचा धनादेश दिल्याची माहिती मुख्य अभियंता कुमठेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे १ हजार ७३२ ग्राहक आहेत. यातील १ हजार ६११ ग्राहकांकडे ३५ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे. तर जिल्ह्यात पथदिव्यांचे ३ हजार ५६४ ग्राहक आहेत. यातील ५० वगळता उर्वरित ३ हजार ५१४ ग्राहकांकडे वीज देयकांची जवळपास ११८ कोटी ३९ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे.