अनुसूचित जाती जमातीसाठी खावटी कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:10+5:302021-07-21T04:16:10+5:30
जामखेड : अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान योजनेतून कर्जत येथील ५५२ व जामखेड येथील ४५८ लाभार्थ्यांना कर्जत-जामखेड एकात्मिक विकास ...

अनुसूचित जाती जमातीसाठी खावटी कर्ज वाटप
जामखेड : अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान योजनेतून कर्जत येथील ५५२ व जामखेड येथील ४५८ लाभार्थ्यांना कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांच्या हस्ते अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले.
जामखेड येथील ल. ना होशिंग विद्यालयाच्या डॉ. अब्दुल कलाम सभागृहात अनुसूचित जाती जमातींना खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अन्नधान्य व किराणा किट देण्यात आले. यावेळी
तहसीलदार विशाल नाईकवाडे, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, मधुकर राळेभात,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, सहायक प्रकल्प अधिकारी सुनील बारसे, कर्जत तालुका समन्वयक मिलिंद गुंजाळ उपस्थित होते. सुनंदाताई पवार म्हणाल्या, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून खावटी योजनेतील मदत या कुटुंबांना वाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सन २०१३-१४ पासून बंद असलेली खावटी अनुदान योजना सन २०२०-२०२१ या एका वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वीच दोन हजार रुपये प्रति कुटुंब अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असून दोन हजार रुपये किमतीच्या किराणा स्वरूपातील वस्तू वाटप करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.