युती सदस्यांचा सभात्याग
By Admin | Updated: July 7, 2014 00:37 IST2014-07-06T23:49:08+5:302014-07-07T00:37:06+5:30
अहमदनगर: अभ्यासाचे कारण देत महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा तहकूब करण्याच्या मागणीसाठी युतीच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला़
युती सदस्यांचा सभात्याग
अहमदनगर: अभ्यासाचे कारण देत महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा तहकूब करण्याच्या मागणीसाठी युतीच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला़ सत्ताधाऱ्यांसोबत फरपटत न जाण्याचा निर्णय जाहीर करून युतीने सत्ताधारी पक्षाला सूचक इशारा दिला़ त्यामुळे महापालिकेतील राजकारण यापुढे तापण्याची चिन्हे आहेत़
महापालिकेचे यंदाचे ५९९ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी सर्वसाधारण सभेत सादर केले़ अभ्यास करण्यासाठी चार दिवस वेळ द्या, अशी युतीची मागणी होती़ मात्र एक दिवस वेळ देऊन दुसऱ्या दिवशी सभा घेण्याचे शनिवारच्या सभेतच ठरले होते़ त्यानुसार रविवारी महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली अंजदाजपत्रकीय सभेला सुरुवात झाली़ अर्धा तास उशिराने सेना-भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला़ भाजपाचे अभय आगरकर यांनी ध्वनीक्षेपकाचा ताबा घेत शहराच्या विकासाच्यादृष्टीने अंदाजपत्रक महत्वाचे आहे़ त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली पाहिजे़ सभागृहातील ८० टक्के सदस्य नवीन आहेत़ अंदाजपत्रकात काय तरतुदी आहेत, याची माहिती नाही़ प्रशासनाकडून माहिती घेण्यास वेळ मिळाला नाही़ त्यामुळे सभा तहकूब करून बुधवारी घ्या, अशी मागणी महापौरांकडे केली़ त्यावर महापौर जगताप म्हणाले, एक दिवसाची वेळ दिली होती़ काय चर्चा करायची ती करा, चर्चा करण्यास आमचा नकार नाही, अशी भूमिका स्पष्ट करीत त्यांनी सभा तहकूब न करण्याचे संकेत दिले़ त्यावर शहर विकासाचे गांभीर्य नाही, असा आरोप आगरकरांनी केला़ स्थायी समितीचे सभापती डागवाले यांनी चर्चेत सहभाग घेत जेवढ्या दिवस चर्चा करायची आहे, तेवढ्या दिवस चर्चा करा, काही हरकत नाही. परंतु सभात्याग करू नये, अशी सूचना मांडली़ यावरून आगरकर व डागवाले यांच्यात जुंपली़
महापौरांनी चर्चा करण्याची तयारी दर्शविली़ मात्र तुम्हाला अंदाजपत्रकावर चर्चा होऊ द्यायची नाही, असे सांगून भाजपा व सेनेचे नगरसेवक बाहेर जात असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि ते बाहेर पडले़ त्यांच्यापाठोपाठ सदस्य अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव बाहेर पडले़ विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर अंदाजपत्रकातील जमा व खर्चाच्या बाजूवर बराचवेळ चर्चा झाली़ किरकोळ दुरुस्तीसह अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली़ मंजुरी देण्याच्यावेळी विरोधी पक्षाचे सदस्य हजर नव्हते़ (प्रतिनिधी)