मोकाट कुत्र्यांवरून अहमदनगरमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक; प्रशासनाला धरले धारेवर
By अरुण वाघमोडे | Updated: August 14, 2023 19:30 IST2023-08-14T19:29:51+5:302023-08-14T19:30:11+5:30
मनपा मोकाट कुत्रे पकडण्यासाठी व शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, कुत्र्यांची संख्या कमी झाली नसून ती अधिक वाढली आहे.

मोकाट कुत्र्यांवरून अहमदनगरमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक; प्रशासनाला धरले धारेवर
अहमदनगर : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याने स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले. येत्या २८ ऑगस्टपर्यंत कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा महासभेत कुत्रे सोडू, असा इशारा सभापती गणेश कवडे यांच्यासह उपस्थित नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.
सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१४) महापालिकेत स्थायी समितीची सभा झाला. सभेला प्रारंभ होताच नगरसेवक रूपाली वारे, विनीत पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक निखिल वारे यांनी कुत्र्यांच्या दहशतीची प्रतिमा हातात घेऊन सभागृहात प्रवेश करत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली. यावेळी नगरसेवक वारे, पाऊलबुधे, त्र्यंबके यांच्यासह संपत बारस्कर, मुद्दसर शेख, नजीर अहमद ऊर्फ नज्जू पहिलवान, कमल सप्रे, ज्योती गाडे, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे, पल्लवी जाधव या सर्वच सदस्यांनी कुत्र्यांच्या दहशतीची तीव्रता निदर्शनास आणून दिली.
मनपा मोकाट कुत्रे पकडण्यासाठी व शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, कुत्र्यांची संख्या कमी झाली नसून ती अधिक वाढली आहे. मोकाट कुत्रे टोळीने नागरिकांवर हल्ले करत आहेत. यापूर्वी शहरात कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. मनपाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असल्याचे त्र्यंबके व इतर नगरसेवकांनी सांगितले. यावर उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश राजूरकर यांनी सांगितले की, ३० जून रोजी कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदार संस्थेचा कालावधी संपला आहे. सदर संस्थेला मुदतवाढ देण्यात येणार होती मात्र त्यांनी काम करण्यास नकार दिला. आता नवीन निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रशासकीय प्रक्रिया तातडीने राबवा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा यावेळी सपती कवडे यांनी दिला.