दिल्लीतील आंदोलनातील सहभागी सर्व भामटेच
By | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:59+5:302020-12-07T04:14:59+5:30
अहमदनगर : दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे ...

दिल्लीतील आंदोलनातील सहभागी सर्व भामटेच
अहमदनगर : दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झाले आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. एकाने कायदे करायचे आणि दुसऱ्याने विरोध करायचा, अशीच कॉंग्रेस व भाजपाची धोरणे असल्याने दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीकाही पाटील यांनी केली.
शेतकरी संघटनेची जनप्रबोधन यात्रा रविवारी नगरमध्ये आली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाबाबत शंका उपस्थित करीत पाटील म्हणाले, दिल्लीचे आंदोलन हे फसवून आणलेल्या शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांपेक्षा तेथे आडते, हमाल असेच लोक अधिक आहेत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन मानत नाही. वन्यप्राणी संरक्षण कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा, जमीन अधिग्रहण कायदा याबाबतीत आंदोलक काही बोलत नाहीत. शेतकऱ्यांना खरा त्रास ज्या कायद्यापासून आहे, त्या कायद्यांचा उच्चारसुद्धा या आंदोलनात झालेला नाही.
आजच्यासारखे कायदे २००६ ला मनमोहन सिंग यांनी केले, तेव्हा भाजपने विरोध केला. आज भाजप कायदे करीत आहे, तर काँग्रेस विरोध करीत आहे. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हेच दिसून येते. देशात ७० वर्षे काँग्रेसची राजवट होती. त्यांनी शेतमालाची निर्यातबंदी उठविली नाही. वाजपेयी सरकारनेही निर्यातबंदी उठविली नाही की, नरेंद्र मोदी यांनीही निर्यातबंदी उठविली नाही. भाजप व काँग्रेस या दोघांची आर्थिक धोरणे एकच आहेत. हे फक्त मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे.