सर्व बाजार समित्या आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:47+5:302021-05-19T04:20:47+5:30
जिल्ह्यात कोरोबाधिताची संख्या वाढत असल्याने व दैनंदिन रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा आपत्ती ...

सर्व बाजार समित्या आजपासून बंद
जिल्ह्यात कोरोबाधिताची संख्या वाढत असल्याने व दैनंदिन रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सोमवारी बैठक घेतली. तसेच यात जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढते रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता आणि कोरोनाची साखळी तोडणेकरिता जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याबाबत उपस्थितांचे एकमत झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार १८ मे च्या रात्री बारा वाजल्यापासून ते ३१ मे चा रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
----
पर्यायी व्यवस्था बाजार समितीकडे
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहणार आहे. तसेच समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांची राहणार आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व साथरोग अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.