मिडसांगवीसह १० किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:18+5:302021-01-13T04:54:18+5:30
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे बर्ड फ्लूसदृश रोगाने ५२ कोंबड्या मृत झाल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने मिडसांगवी व ...

मिडसांगवीसह १० किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे बर्ड फ्लूसदृश रोगाने ५२ कोंबड्या मृत झाल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने मिडसांगवी व १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क भाग (अलर्ट झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी जामखेड तालुक्यातील मोहा येथे ३ कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
सोमवारी मिडसांगवी येथे बर्ड फ्लूसदृश रोगाने ५ पशुपालकांच्या ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत खबरदारीचे आदेश दिले आहेत. मिडसांगवी व १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क घोषित केल्याने या कार्यक्षेत्रात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) यांनी या तालुक्यातील सर्व कुक्कुट फार्म, परसातील कोंबड्यांची तपासणी करावी व मरतूक आढळून आल्यास नियंत्रक कक्षाला (०२४१-२४७१३२२) माहिती द्यावी. कुक्कुटपालकांनी मृत किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना द्यावी, अधिकाऱ्यांनी विभागातील पोल्ट्री फार्मला भेटी देऊन ७ दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून नियंत्रण कक्षाला लेखी स्वरूपात कळवावे. आजारी पक्ष्यांचे विलगीकरण करावे व ते पक्षी इतर प्राण्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कुक्कुटपालकांनी आजारी पक्ष्यांची वाहतूक अथवा विक्री करू नये, सतर्क क्षेत्रामध्ये जिवंत वा मृत पक्षी तसेच अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आदींची वाहतूक करू नये, पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तत्काळ तपासणीसाठी पाठवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
-------
अशी लावावी विल्हेवाट
मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्यात यावेत, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा, असेही या आदेशात म्हटले आहे.
-------------
आज मिळणार नमुन्यांचा अहवाल
सोमवारी मिडसांगवी येथे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या कोंबड्या नेमक्या कशामुळे मृत झाल्या किंवा जिल्ह्यात बर्ड फ्लूची साथ आहे का, हे स्पष्ट होणार आहे.