संगमनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्या लाटेत करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही बंद होते. दारूची दुकाने बंद असल्याने छुप्या पद्धतीने, अधिक दराने दारू विक्री सुरू होती. दारूची दुकाने बंद असताना आणि आता दारूची दुकाने सुरू झाल्यानंतरही नागरिकांना दारुड्यांचा त्रास नेहमीचाच झाला आहे. सार्वजनिक तसेच इतरही अनेक ठिकाणे दारू पिण्याचा अड्डा बनली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या बहुतांशी दुकानांबरोबर देशी, विदेशी दारूची दुकानेही सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, परमिट रूम, बीअर बारमध्ये दारू पिण्यासाठी बसण्यास बंदी असल्याने दारुड्यांनी पार्सल घेऊन सार्वजनिक ठिकाणांना दारू पिण्याचा अड्डा बनविले होते. आजही तशीच परिस्थिती कायम आहे. व्यापारी संकुले, मैदाने, मोकळ्या जागा, प्रवरा, म्हाळुंगी नदी परिसर, बांधकामे सुरू असलेली ठिकाणे, बसस्थानक परिसर, नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरील उड्डाणपूल अशा अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर ओल्या पार्ट्या सुरू होतात. दारूच्या बाटल्या फेकल्यानंतर त्या फुटतात. याचा शेतकरी, तेथे राहणाऱ्या परिसरातील नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे सार्वजनिक तसेच इतरही अनेक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
-----------------------
सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे दारू पिणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही कारवाई करण्यात आली. दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आले. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालून नागरिकांना त्रास होईल, असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते आहे.
-मुकुंदराव देशमुख, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस ठाणे.
---------------------
आकडेवारी काय सांगते
गुन्ह्याचे प्रकार २०२० (जुलै २०२१ पर्यंत)
खून २ १
खुनाचा प्रयत्न - ६
दरोडा तयारी - ३
जबरी चोरी - ७
बलात्कार ५ ७
सरकारी कामात अडथळा ५ ५
(शहर पोलीस ठाणे, संगमनेर)
------------------
दारूचे व्यसन आणि गुन्हेगारी यांचा संबंध असतो. कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, रस्ते अपघात, सामाजिक शांततेचा भंग याला व्यसन हेच अनेकदा कारणीभूत ठरते. घडलेल्या गुन्ह्यांपैकी चाळीस टक्के गुन्हे हे व्यसन केल्यानंतरच घडलेले असतात. व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे नियंत्रण अनेकदा सुटते, त्यामुळे तो व्यसन केल्यानंतर काय करतो याच्या होणाऱ्या भविष्यातील परिणामांची त्याला काळजी घेण्याविषयी माहिती द्यावी.
डॉ. अभिजीत पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, संगमनेर