भाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये विठ्ठल नामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:50+5:302021-07-21T04:15:50+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. कोरोना रुग्णांनाही मंदिरात जाऊन, पंढरीत जाऊन दर्शन घेण्याची इच्छा होती. ही ...

भाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये विठ्ठल नामाचा गजर
अहमदनगर : कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. कोरोना रुग्णांनाही मंदिरात जाऊन, पंढरीत जाऊन दर्शन घेण्याची इच्छा होती. ही त्यांची इच्छा आमदार नीलेश लंके यांनी पूर्ण केली. भाळवणी (ता. पारनेर) येथील शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर, आरोग्य मंदिरातील कोरोना रुग्णांनी मंगळवारी विठ्ठल नामाचा गजर केला. विठ्ठल मंदिराप्रमाणे या आरोग्य मंदिरालाच त्यांनी प्रदक्षिणा घातली. यावेळी कोरोना रुग्णांसह डॉक्टर, स्वयंसेवक, भजनी मंडळ आणि परिसरातील भाविकही या आगळ्या-वेगळ्या दिंडीत सहभागी झाले होते.
पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानतर्फे भाळवणी (ता. पारनेर) येथे ११०० बेडचे शरदचंद्रजी पवार कोविड केअर सेंटर आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो रुग्ण या आरोग्य मंदिरातून बरे झाले. उपचारासोबतच भजन, कीर्तन, भारुड, संगीत, व्याख्याने आदी उपक्रम या कोविड सेंटरमध्ये झाले. यामुळे रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळाला व तो कोरानातून बरे झाले. आजही पारनेर तालुक्यात रोज सरासरी ८० ते ९० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील रुग्ण सेवा अविरत सुरू आहे. आषाढी एकादशीनिमित्त सर्वच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरात तसेच वारीमधून पंढरपूरला जाण्याची अनेकांच्या इच्छेला मुरड घालावी लागली. मात्र कोरोना रुग्णांची ही विठ्ठलभक्तीची आस पाहून आमदार नीलेश लंके यांनी या आरोग्य मंदिरातच दिंडी काढली. या कोविड सेंटरमध्ये सध्या कोरोनाचे चारशे रुग्ण उपचार घेत आहेत.
मंगळवारी दुपारी ४ वाजता काढलेल्या या दिंडीत चारशे कोरोनाचे रुग्ण सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतीला परिसरातील भजनी मंडळ, कोविड सेंटरमधील डॉक्टर, स्वयंसेवक, आमदार नीलेश लंके यांचे कार्यकर्ते दिंडीत सहभागी झाले होते. ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत या दिंडीत आरोग्य मंदिर असलेल्या कोविड सेंटरला प्रदक्षिणा घातली. हा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमला. रुग्णांनीही हाती टाळ, मृदंग, वीणा, वारकरी संप्रदायाचा ध्वज हाती घेऊन आम्ही ठणठणीत असल्याचा संदेश दिला.
-----------
आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येकाची पंढरीला जाण्याची मनोमन इच्छा होती. ही इच्छा आमदार नीलेश लंके यांनी ओळखली व दिंडीचे नियोजन केले. कोविड सेंटरमधील सेवाधर्म हाच आमचा विठ्ठल व कोविड सेंटर हेच खरे आरोग्य मंदिर आहे. त्यामुळे या मंदिरालाच आम्ही प्रदक्षिणा घातली. विठ्ठल नामाच्या गजराने रुग्णांमध्ये एक आत्मविश्वास आला. ही जगातील अनोखी वारी असावी.
-डॉ. सुनील गंधे, भाळवणी
------------
फोटो- आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे भाळवणी (ता. पारनेर) येथील शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर, आरोग्य मंदिरामधील कोरोनाच्या रुग्णांनी दिंडी काढली. या आरोग्य मंदिरालाच प्रदक्षिणा घालून विठ्ठल नामाचा गरज केला. (छायाचित्र- साजिद शेख)