अकोले पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 15:35 IST2017-10-05T15:28:55+5:302017-10-05T15:35:26+5:30

अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील सावळेराम दातीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास अकोले पोलिसांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे बोट दाखवित अकोले पोलीस दातीर पतसंस्थेच्या संचालक मंडळास पाठिशी घालताना दिसत आहेत.

Akole refused to register a police complaint | अकोले पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास नकार

अकोले पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास नकार

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेकडे दाखविले बोटअटकपूर्व जामीन मिळविण्याचाही प्रयत्न  दातीर पतसंस्थेतील सव्वा पाच कोटींचा अपहार

अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील सावळेराम दातीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास अकोले पोलिसांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे बोट दाखवित अकोले पोलीस दातीर पतसंस्थेच्या संचालक मंडळास पाठिशी घालताना दिसत आहेत.
एस. एस. सोमाणी अँड असोसिएट्स चार्टंर्ड अकाउंटंट या फर्मच्या सुविद्या सोमाणी यांनी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले होते. त्यातून संस्थेच्या अपहारावर प्रकाश पडला. या पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार ‘लोकमत’ने १० सप्टेंबरला सर्वप्रथम उजेडात आणला. तसेच याबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत अकोल्याचे सहायक निबंधक कांतिलाल गायकवाड यांनी लेखापरीक्षकांना विशेष अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विशेष अहवाल प्राप्त झाल्यानंतर पतसंस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्याचाही आदेश गायकवाड यांनी दिला. त्यानुसार लेखापरीक्षक सोमाणी यांनी अकोले येथील पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची गेल्या महिन्यात भेट घेऊन त्यांच्याकडे फिर्याद दिली. पण अपहाराची रक्कम मोठी असल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्याचा आम्हाला अधिकार नाही. तुम्ही याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद दाखल करा, असा सल्ला शिळीमकर यांनी दिला. अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असल्याने तेथेच गुन्हा नोंदविणे क्रमप्राप्त असताना अकोले पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे बोट दाखवित गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करून पोलीसच संचालक मंडळास पाठिशी घालीत असल्याचे दिसते. कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊन अटक होण्याची भीती असल्याने संचालक मंडळातील काही पदाधिका-यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचाही प्रयत्न केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करावा व संचालक मंडळाने ठेवीदारांचे पैसे परत देण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी रविवारपासून अकोले तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
लेखापरीक्षकांचीच फरपट
चार्टंर्ड अकाउंटंट सुविद्या सोमाणी यांनी पतसंस्थेचे सन २०१६-१७ चे लेखापरीक्षण केले. त्यातून सव्वा पाच कोटींचा अपहार निष्पन झाल्यानंतर विशेष अहवालदेखील त्यांनी सादर केला. सरकारी अधिकारी नसतानाही सहायक निबंधकांच्या आदेशानुसार सोमाणी यांनी अपहाराबाबत अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस फिर्याद दाखल करून घेत नसल्याने सोमाणी यांचीच यात फरपट होत आहे. पोलिसांकडे चकरा मारून त्या आजारी पडल्या आहेत.

Web Title: Akole refused to register a police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.