राहुरी : विविध कंपन्या व स्टार्ट-अप यांच्या सहकार्याने संशोधन करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचबरोबर डेटा ॲनालिटिक्स व स्टोरेज सुविधा गरजेचे आहे, असे भारत सरकार नागरी उड्डायन मंत्रालयाचे सहसचिव अंबर दुबे यांनी सांगितले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कास्ट-कासम या प्रकल्पांतर्गत ड्रोनची मूलभूत तत्त्वे या विषयावर आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील होते. यावेळी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता दिलीप पवार, कार्यक्रमाचे निमंत्रक सुनील गोरंटीवार, कार्यक्रम संचालक सचिन नलावडे उपस्थित होते.
दुबे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन व विकास आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्यासाठी डीसीजीएकडून सर्व सहकार्य व मान्यता देण्यासाठी तयारी दर्शविली. भारतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाच्या संचानालयासाठी परिसंस्था विकसित करण्यात येत आहे. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व मोठे आहे. विना आडकाठी ड्रोन चालविण्यासाठी ग्रीन झोन तयार करण्यासाठी डीजीसीएने राबविलेल्या विविध उपायोजनांची त्यांनी माहिती दिली.
कुलगुरू पाटील म्हणाले, ड्रोनच्या संशोधनासाठी अत्याधुनिक संशोधन व विकास प्रयोगशाळा अधिक कार्यक्षम करणे व ड्रोन चालकांसाठी प्रशिक्षण संस्था चालू करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. तसेच इन्कुबेशन सेंटरच्या मदतीने ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन स्टार्ट-अपला मदत करून त्यांना सक्षम करण्याची तयारी दर्शविली. या राष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणात १०२ प्रशिक्षणार्थिंनी सहभाग नोंदवला. दिलीप पवार यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.