डिजिटल शाळांमध्ये अहमदनगर अव्वल, शिक्षकही तंत्रस्नेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 13:10 IST2017-11-23T13:06:32+5:302017-11-23T13:10:42+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र उपक्रम राबविला जात असून याअंतर्गत राज्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा उल्लेख प्रगतच्या अध्यादेशात करण्यात आला आहे. मात्र, विद्येचे माहेरघर आणि ह्यआयटी हबह्ण अशी ओळख असलेल्या पुणे डिजिटल शाळांमध्ये मागे पडले आहे तर अहमदनगरने अव्वल स्थान पटकावले आहे.

डिजिटल शाळांमध्ये अहमदनगर अव्वल, शिक्षकही तंत्रस्नेही
राहुल शिंदे
पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र उपक्रम राबविला जात असून याअंतर्गत राज्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा उल्लेख प्रगतच्या अध्यादेशात करण्यात आला आहे. मात्र, विद्येचे माहेरघर आणि ह्यआयटी हबह्ण अशी ओळख असलेल्या पुणे डिजिटल शाळांमध्ये मागे पडले आहे तर अहमदनगरने अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब असलेल्या शाळांची संख्या केवळ ४८७ आहे. तर एकही संगणक चालू नसलेल्या राज्यातील शाळांची संख्या तब्बल ३७ हजार आहे.
राज्यात डिजिटल शाळा तयार करण्याची एक लाट तयार झाली. काही शिक्षकांनी लोकसहभागातून डिजिटल शाळा तयार करण्याचे काम हाती घेतले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी (सीएसआर) अंंतर्गत निधी उभा राहत आहे. त्यामुळे शासनाने राज्यनिधीला लोकसहभागाची जोड देऊन राज्यातील सर्व शाळा येत्या २-३ वर्षांत डिजिटल करण्याबाबत योजना तयार करण्याचे निश्चित केले. तसेच डिजिटल शाळांची चळवळ उभी राहावी, या उद्देशाने शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी टॅबलेट उपलब्ध करून देणार असल्याचे अध्यादेशातून जाहीर केले. राज्यातील केवळ ६१ हजार शाळा आतापर्यंत डिजिटल झाल्या असून सुमारे १ लाखाहून अधिक प्राथमिक शाळांना डिजिटल करण्याचे मोठे आवाहन शासनासमोर आहे. त्यातही चार विद्यार्थ्यांमागे १ टॅब असणा-या शाळांची संख्या १७६ आहे. तसेच ५ पेक्षा अधिक संगणक असलेल्या शाळांची संख्या ५ हजार ९८८ असून ५ हजार ८४४ शाळांमध्ये ३ ते ५ संगणक आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील १८ हजार २०१ शाळांमध्ये एक किंवा दोन संगणक आहेत. तर राज्यातील शाळांमध्ये वापरात असलेल्या संगणकांची संख्या ३० हजार आहे. शासनाकडून डिजिटल शाळांच्या निर्मितीबाबत प्रयत्न केले जात असले तरी त्यास गती देण्याची आवश्यकता असल्याचे शाळांमधील संगणकांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यात राज्यातील शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या तंत्रस्नेही प्रशिक्षणासाठी राज्यातील तब्बल १ लाख ६० हजार शिक्षकांनी नोंदणी केली. त्यातील १ लाख ७ हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील डिजिटल शाळांची आकडेवारी
अहमदनगर ५,२२३
कोल्हापूर २,८३३
पुणे १,८६९
रत्नागिरी १,९०७
सांगली १,७६४
सातारा १,८९८
सिंधुदुर्ग १,३३२
सोलापूर १,७०४
तंत्रस्नेही शिक्षकांच्या संख्येत वाढ
दिवसेंदिवस तंत्रस्नेही शिक्षकांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसे शिक्षण देता येईल. त्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा, त्यासाठी शिक्षकांकडून अॅप्स, व्हिडीओ, वेबसाईट व ब्लॉग्ज तयार केले जात आहेत. आतापर्यंत शिक्षकांनी ४ हजार १८ अॅप्स, ४८ हजार ६४५ व्हिडीओ आणि ५ हजार ९८७ वेबसाईट तयार केल्या आहेत.