अहमदनगर लोकसभा : दोन दिवस थांबा... सर्व्हे सुरू - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:44 IST2019-03-05T11:44:24+5:302019-03-05T11:44:40+5:30
श्रीगोंद्यातील दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी वाघोलीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.

अहमदनगर लोकसभा : दोन दिवस थांबा... सर्व्हे सुरू - अजित पवार
श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी वाघोलीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अनुराधा नागवडे यांची उमेदवारी जाहीर कधी करता असे विचारले असता ‘आमचा सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची, हे दोन दिवस सांगता येणार नाही’ असे अजित पवार म्हणाले.
आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, हरिदास शिर्के यांनी पवार यांच्याशी चर्चा केली.
मागील आठवड्यात शरद पवार यांनी अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. २ मार्च रोजी नागवडे टीमचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. पण डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची थेट शरद पवारांना विनंती केली. मात्र अद्यापपर्यथ पवार यांनी काहीच भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार यांना विखे नको आहेत. पण अजित पवार हे नगरमधून डॉ. सुजय विखे उमेदवारी देण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसते. नागवडे समर्थकांनी लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
पवार काका - पुतणे मिडीयाला एक माहीती देतात. अंधारात दुस-याच राजकिय खेळ्या करतात. त्यामुळे नागवडे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन मध्ये करणार काय असा प्रश्न सर्वांना आहे.
विखेंच्या उमेदवारीसाठी अण्णा शेलारांचे प्रयत्न
अहमदनगर लोकसभा मतदार संघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्यासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते बाळासाहेब गिरमकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली. अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीला विरोध केला. आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे हे भेटून आल्यानंतर एक तासाने शेलारांनी भेट घेतली.