अहमदनगर: धान्य दुकानावरील कारवाई टाळण्यासाठी पारनेरच्या पुरवठा निरिक्षकाने मागितली १५ हजारांची लाच
By अण्णा नवथर | Updated: July 1, 2023 15:24 IST2023-07-01T15:23:54+5:302023-07-01T15:24:12+5:30
बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानावर सेल्स्मन म्हणून तक्रादार २०२० पासून कार्यरत आहेत.

अहमदनगर: धान्य दुकानावरील कारवाई टाळण्यासाठी पारनेरच्या पुरवठा निरिक्षकाने मागितली १५ हजारांची लाच
अहमदनगर: स्वस्त धान्य दुकानदारावरील कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पारनेर येथील पुरवठा निरिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल मच्छिंद्र काकडे, असे पुरवठा निरिक्षकाचे नाव आहे.
यादववाडी येथील ( ता. पारनेर) जय जवान बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानावर सेल्स्मन म्हणून तक्रादार २०२० पासून कार्यरत आहेत. त्यांनी वाडेगव्हाण ( ता. पारनेर ) येथील लाभार्थींना धान्य वितरीत केले होते. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पुरवठा निरिक्षक काकडे यांनी २० हजारांची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी (दि. २४ ) पारनेर तहसील कार्यालयात जावून पथकाने पडताळणी केली असता आरोपी याने लाचेची मागणी करत १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
त्यामुळे आरोपी विठ्ठल काकडे याच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पालीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरिक्षक शरद गोर्डे, पोलीस नाईक रमेश चौधरी, पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, बाबासाहेब कराड आदींच्या पथकाने केली.