VIDEO: अहो आश्चर्यम्! मादी श्वानाला लागलाय मांजरीचा लळा; अनोखं दृश्य पाहण्यासाठी वाटसरुंची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 08:45 IST2021-06-26T08:37:27+5:302021-06-26T08:45:08+5:30
जन्म झाल्यानंतर आई गमावणाऱ्या मांजरीच्या पिल्लाची कुत्री घेतेय काळजी

VIDEO: अहो आश्चर्यम्! मादी श्वानाला लागलाय मांजरीचा लळा; अनोखं दृश्य पाहण्यासाठी वाटसरुंची गर्दी
- मच्छिंद्र अनारसे
कर्जत (जि. अहमदनगर ) : जुन्या काळी "बाई माझ्या बकरीचा संमद्यासनी लागलाय लळा" हे गाणं लोकप्रिय झाले होते. त्याप्रमाणे कर्जतमध्ये "बाई माझ्या कुत्रीला लागलाय मांजराचा लळा" असं म्हणायची वेळ आली आहे. मांजर आणि कुत्रा यांचं वैर सर्व श्रुत आहे. मात्र कर्जत शहरात हॉटेल व्यावसायिक छोट्या राऊत यांच्या घरी मांजराचे पिल्लू कुत्रीचे दूध पित आहे. हे दृश्य सर्वत्र कुतूहलाचा विषय बनले आहे.
कर्जतपासून जवळच असलेल्या कर्जत शिंदेवाडी रोडलगत छोट्या राऊत यांचे हॉटेल आहे. येथे कुत्री, तिची पिल्ले आणि मांजर कुटुंबातील सदस्य बनले आहेत. छोट्या राऊत यांचे कर्जत शिंदेवाडी रोड लगत छोटे हॉटेल आहे. तेथे कुत्री आणि मांजर दोघे एकाचवेळी प्रसूत झाले. मांजरीला सहा पिल्ले झाली तर कुत्रीला पाच पिल्ले झाली. मात्र दुर्दैवाने मांजर आणि तिची पाच पिल्ले मरण पावली. मांजराचे एक पिल्लू जिवंत राहिले. या लहान पिल्लाला जगवायचे कसे ? असा प्रश्न छोट्या राऊत यांना पडला होता. कारण ते पिल्लू काही खात नव्हते. मग एक दिवस कुत्रीच्या पिल्लासोबत मांजराच्या पिल्लाला कुत्रीला पाजले. मग हे नित्याचेच झाले.
अहमदनगर: मादी श्वानाला लागलाय मांजरीच्या पिल्लाचा लळा; अनोखं दृश्य ठरतंय कुतूहलाचा विषय https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/w5FpPMBpfs
— Lokmat (@MiLOKMAT) June 26, 2021
छोट्या राऊत यांनी कुत्रीची पिल्ले विकली. तेव्हापासून तर ही कुत्री व मांजराचे पिल्लू एकत्रच रहात आहेत. खेळतात एकत्र, बागडतात एकत्र. मांजरीच्या पिल्लाचा कुत्रीने सांभाळ केला. त्याच्याकडे आपल्या लेकराप्रमाणे लक्ष ठेवते. हा प्रकार पाहून वाटसरू आश्चर्यचकित होतात. कुत्र व मांजर यांचे हाडवैर असते हे आतापर्यंत प्रत्येकाने पाहिले आहे. ऐकले आहे. मात्र याला कर्जत येथील घटना अपवाद ठरली आहे. हे अनोखे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे मातृत्व पाहण्यासाठी गर्दी होत आहे.