अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतक-यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:23 IST2020-07-03T13:23:39+5:302020-07-03T13:23:54+5:30
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतक-यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देणार
अहमदनगर: लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
यंदा पाऊस चांगला आहे़ परंतु, कोविडच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतक-यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतक-यांनी घेतलेल्या पीक कर्जावर जिल्हा सहकारी बँकेकडून व्याज आकारले जाणार नाही़. केंद्र व राज्य सरकारच्या व्याज परतव्यामुळे तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर २ टक्के व्याज आकारले जात होते. त्यामुळे बँकेच्या सभासदांना २ टक्के व्याज भरावे लागत होते. ही रक्कम जिल्हा सहकारी बँक स्वनिधीतून भरणार असून, शेतक-यांकडून व्याज आकारले जाणार नाही़.
खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेला १ हजार ४९८ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उदिष्टे आहे. यापैकी बँकेने जिल्ह्यातील १ लाख ७० हजार शेतक-यांना १ हजार १ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. रब्बी हंगामासाठी ८०९ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उदिष्टे असून, अधिकाधिक सभासदांना कर्ज वाटप करून उदिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. याशिवाय महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र असलेल्या शेतक-यांना सरकारकडून येणे दर्शवून पीक कर्जाचे वाटप करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, असेही गायकर यांनी पत्रकात म्हटले आहे.